wvgarage2मोटारीची देखभाल – १
मोटार विकत घेण्यापूर्वी ती मोटार आपल्याला सांभाळता येईल की नाही, भविष्यात तिचे आवश्यक सुटेभाग मिळतील की नाही, तिच्या देखभालीसाठी धावाधाव करावी लागणार नाही ना, आदी दुरूस्ती, देखभालीबाबतही सर्व अंगानी विचार करणे हे प्रत्येक ग्राहकाच्या दृष्टीने गरजेचे आहे. अनेकदा मोटारीच्या सुखासाठी मोटार घेताना तिचे भविष्यातील फायदे व तोटे मात्र विचारात घेतले जात नाहीत. मोटारीच्या कंपन्यांची व त्यांच्या विविध नवनव्या मॉडेल्सची रेलचेल सुरूच असते, पण ही नवी मॉडेल्स भवितव्यात उपलब्ध असतील का, की त्यामुळे ते वाहन सांभाळणे पैसे खर्च करूनही शक्य होईल, हा विचार अतिशय गरजेचा आहे.
मोटारीची देखभाल भविष्यकाळात कशा पद्धतीने करावी लागेल, कशा प्रकारे ती उपलब्ध होऊ शकेल, याचा विचार करणे गरजेचे आहे. भारतातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये विविध मोटार उत्पादनांच्या दुकानांची व सेवाकेंद्राची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असते, जाहिरातींमध्ये व विपणनाच्या कामात या सर्वांची भलावणही छान केली जाते. ही स्थिती निमशहरी भागातही थोड्या फार प्रमाणात असते. पूर्णपणे ती असेतच असेही नाही. यामुळे वाहन विक्रेत्याकडून वाहन विकताना दाखविला जाणारा चटपटीतपणा वा प्रोत्साहन वाहनाच्या देखभालीबाबत सर्वच कंपन्यांच्या उत्पादनाबाबत आढळून येत नाही. यामुळेच विशिष्ट केंद्रीत विभाग सोडल्यास वाहनांच्या देखभालीसंबंधातील सेवा सर्वत्र पुरेशा प्रमाणात उपलब्ध असत नाहीत, ही बाब लक्षात घेऊन वाहन विकत घेतानापासूनच ग्राहकाने दक्ष राहावयास हवे. भविष्यातील देखभाल व त्यासाठीचा खर्च लक्षात घेताना खालील मुद्दे विचारात घेऊ.
 ****
  • १) वाहनाच्या सेवा केंद्राची उपलब्धता
  • २) वाहनांच्या सुट्या भागाची तुमच्या भागातील उपलब्धता
  • ३) वाहनाच्या सुट्या भागांची किंमत किफायतशीर आहे की नाही.
  • ४) विमा व वॉरेंटी संलग्न बाबी.
  • ५) तुमच्या भागातील खाजगी गॅरेजची उपलब्धता.
  • ६) इंधनविषयक बाबी
  • ७) रस्ते व अन्य संलग्न बाबी ज्या वाहनांच्या स्थितीला कारणीभूत आहेत.
  • ८) मोटारींच्या अंतर्गत व बाह्य अतिरिक्त सुविधांशी संलग्न बाबी.
  • ९) देखभाल खर्चाची तरतूद.
  • १०) वाहनांच्या उत्पादक कंपनीसंलग्न घटक.
वरील दहा बाबींचा विचार काहीसा तपशीलवार करू. ज्यामुळे वाहन घेण्यापासून भविष्यातील घटकांचा सांगोपांग विचार करता येईल.
 ****
१) वाहनाच्या सेवा केंद्राची उपलब्धता – मोटार कोणत्या कंपनीची विकत घेता ते पाहाताना तुम्ही राहात असलेल्या भागामध्ये त्या संबंधिथ कंपनीचे सेवाकेंद्र उपलब्ध आहे की नाही, नसल्यास तुमच्या भागापासून ते किती लांब आहे, असल्यास ते सेवाकेंद्र पुरेसे प्रभावीपणे काम करणारे आहे की नाही, केवळ कंपनीच्या भरवशावर त्या कंपनीच्या ब्रॅण्डच्या नावाने भुरळून जाणे योग्य आहे का, तेथे काम नीटपणे केले जाते का, वेळेवर तेथे सेवा व सुटे भाग उपलब्ध होऊ शकतात का, यासर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. मोठ्या शहरांमध्ये किमान सुटे भाग मिळण्याची ठिकाणे व शहर मोठे असल्याने या सार्‍या घटकांची उपलब्धता झटकन होऊ शकते. मात्र निमशहरी भागात ती स्थिती असेलच असे नाही. अनेकदा नामांकित कंपन्यांची शोरूम्स, सेवाकेंद्रे निमशहरी भागात उघडलेली असतात. पण ती केेंद्रे तेथून मुख्य शहरातील केंद्रीय कार्यालयाशी जोडलेली असतात. त्यांच्या काही कार्यपद्धतीमुळे अनेकदा तेथे सुटे भाग सर्वच्या सर्व प्रकारचे उपलब्ध असतात असे नाही. सर्व प्रकारच्या दुरूस्तीची कामे तेथे होऊ शकतातच असे नाही. मोटार घेतल्यानंतर लगेच कदाचित या बाबींची गरज लागेल असेही नाही. परंतु, ती गरज लागल्यास तुम्हाला अन्य नजीकच्या दुरूस्ती दुकानात पाठविले जाते. अधिकृत सेवाकेंद्रे आपल्याकडे ही सेवा उपलब्झ नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या आपल्या केंद्रीय सेवाकेंद्रामध्ये कळवावे लागेल, तेथून तो सुटा भाग मागवावा सागेल आदी अनेक कारणे देत असतात. या बाबी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या भागाचा विचार करून मगच कोणत्या उत्पादक कंपनीची मोटार घ्यायची, किंवा जरी घ्यायची तरी देखभालीतील या समस्येबाबत तुम्ही दक्ष राहून, जाणीव ठेवून ती घ्यावी. त्यामुळे एखादी समस्या तुम्च्या मोटारीबाबत उद्भविल्यास तुम्ही मुळातच मोटार दुरूस्तीला कुठे न्यावी लागेल, ते लक्षात घेऊन कारवाई करू शकला.
अधिकृत सेवा केंद्राप्रमाणेच त्या भागात असणारी खाजगी गॅरेजची उपलब्धताही याच पद्धतीने ताडाल, तर तुमच्या परिसरातील ही सुविधा समजा. चांगले गॅरेज असेल, तर ते तातडीने सेवा देणारे आहे की नाही, तेथे काम चांगल्या प्रकारे केले जात आहे की नाही, तेथे होणार्‍या कामाच्या अनुभवासंबंधात अन्य कोणी माहितीची व्यक्ती आहे का, आदी बाबी लक्षात घ्या. त्यामुळे भविष्यात अधिकृत सेवाकंद्रामध्ये जाण्याची आवश्यकता नसेल तर या गॅरेजचा वापर तुम्ही करू शकाल.
२) वाहनांच्या सुट्या भागाची तुमच्या भागातील उपलब्धता – शहरी भागामध्ये सुट्या भागाच्या विक्रीची दुकाने तशी भरपूर असतात. पण काही वेळा कंपनीकडूनच विशिष्ट पद्धतीच्या विपणन धोरणामुळे ठरावीक दुकानांमध्ये सुटे भाग मिळण्याची सोय असेत. काहीवेळा अन्य दुकानांमध्ये वा त्या ठरावीक दुकानांमध्ये सुटा भाग उपलब्ध नसेल तर तो तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो. मात्र तो उपलब्ध करून देताना त्यात किती तत्परता दाखविली जाते, हे पाहाणेही महत्त्वाचे आहे. निमशहरी भागात अशा प्रकारची दुकाने खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. किंबहुना नसतातच. मात्र तेथे उपलब्ध असणार्‍या दुकानदारांकडून वा गॅरेज मालकांकडून आवश्यक सुटा भाग अव्वाच्या सव्वा किंमतीत आणून दिला जातो. ही बाब नीट लक्षात घ्या की तुम्ही राहात असलेल्या वा तुमचे वाहन ज्या ठिकाणी अधिक काळ ये-जा करणारे असेल त्या परिसरात वाहनांच्या सुट्या भागाच्या बाबी उपलब्ध नीटपणे होऊ शकतात की नाही. तसे न झाल्यास काहीवेळा गॅरेज वा मेकॅनिक उपलब्ध होऊनही सुटा भाग नसल्यास वेळेचा अपव्यय होऊ शकतो.
३) वाहनाच्या सुट्या भागांची किंमत किफायतशीर आहे की नाही – मोटार घेतानाच एक महत्त्वाचा निर्णय आर्थिकदृष्टीने घ्यावा, तो म्हणजे तुमच्या मोटारीच्या किंमतीच्या तुलनेत एक विशिष्ट टक्क्याची रक्कम तुम्ही बाजूला ठेवावी. किंवा दुसर्‍या कल्पनेतून सांगायचे तर समजा तुमचे मोटार विकत घेण्याचे पूर्ण बजेट पाच लाख रुपये असेल तर एक लाख रुपये तुम्ही बाजूला काढून ठेवा. त्यामुळे तुमच्या मोटारीला वर्षभरातही काही झाले व त्यासाठी विमासंलग्न फायदे मिळाले नाहीत, तर तुम्हाला ही रक्कम वापरता येऊ शकते. मोटारीच्या किंमती जशा वर्षभरात दोन-तीनवेळा वाढत असतात, तशाच त्यांच्या सुट्या भागाच्या किंमतीही वाढत असतात. त्यासाठी अंदाजित रक्कम तुम्ही तुमच्यापाशी नेहमी तयार ठेवा, ज्यामुळे तुम्हाला गरजेच्यावेळी आर्थिक ओढाताण सहन करावी लागणार नाही. आर्थिकदृष्ट्या पूर्ण सक्षम असणार्‍यांबाबत कदाचित हा प्रश्‍न उद्भवू शकणार नाही. परंतु आज सर्वसामान्य मध्यमवर्गाकडेही मोटारी आहेत, ते लक्षात घेऊन अशा प्रकारची तरतूद करणे हे अतिशय आवश्यक आहे.
सुट्या भागाची किंमत एमआरपी न लावता काहीवेळा त्यापेक्षा अधिक आकारणी केली जाते. गरजवंताला अक्कल नसते, अशा उक्तीप्रमाणे ग्राहक त्या गरजेच्यावेळी ती किंमत देऊन मोकळा होतो. सुट्या भागाच्या किंमतीबाबत ग्राहकधारर्जिणी बाजारपेठ राहिलेली नाही, हे लक्षात घ्या. सुट्या भागाच्या खरेदीपूर्वी तो पूर्ण तपासून पाहा, विकत घेताना अन्य कंपन्यांचे त्याच प्रकारचे सुटे भाग आहेत का, त्यांची किंमत व दर्जा आदीबाबतही चौकशी करून मग निर्णय घ्या.
४) विमा व वॉरेंटी संलग्न बाबी – मोटार विकत घेताना एक वर्षाचा विमा व एक वर्षाची वॉरेंटी दिली जाते. त्यानंतर विस्तारित वॉरेंटी देण्याचा प्रस्तावही ठेवला जातो. तो प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी वर दिलेल्या सर्व प्रकारच्या बाबी लक्षात घ्या. त्याचप्रमाणे वॉरेंटीबाबतचे नियम तुम्ही पूर्ण वाचा. सेल्समनच्या सांगण्यावर भुलून जाऊ नका, नियमांमधून काहीवेळा वॉरेंटीचा फायदा कसा टाळला जातो, त्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे विस्तारित वॉरेंटीची गरज आहे का, तसेच वार्षिक देखभाल कराराची गरज आहे का, हे सारे पाहा, त्या खर्चाचा विचार करा. काहीवेळा अधिकृत मोटार उत्पादक कंपन्यांच्या वितरक, सेवाकेंद्रांचा तो भुलभुलैय्या फायदेशीर पडण्याऐवजी तोट्याचाही ठरू शकतो. तो एक व्यवहार म्हणून या कंपन्या पाहात असतात. ग्राहकहीत नेमके काय आहे, हे तुम्ही पडताळले पाहिजे. विमा म्हणजे नेमका काय, त्याचे फायदे नेमके कसे असतात, कोणत्या परिस्थितीत ते लागू असतात, कधी लागू नसतात, तुमचा ग्राहक म्हणून त्यात अधिकार किती आहे, विमा प्रतिनिधी म्हणून काम करणारी कंपनी वा व्यक्ती तुम्हाला संकटकाळी मदत करणारी ठरू शकेल की नाही, या सार्‍या बाबी लक्षात घ्या. साधारणपणे मोटारीचा विमा वर्षाचा असतो. तो संपल्यावर तुम्ही अपघात दावा वा अन्य काही दावा करून विम्याची रक्कम घेतलेली नसेल तर पुढील वर्षी तो विमा घसार्‍यानुसार कमी होतो त्याचप्रमाणे मोटारीचे मूल्यमापनही कमी असते. तसेच विमा दावा न केल्यासाठीचा बोनस (नो क्लेम बोनस) मिळतो. या सार्‍या बाबी समजून घ्या.
http://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/wvgarage2-e1411577881911.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/wvgarage2-e1411577881911-150x150.jpgadminदेखभालcar,dashboard,engine,garages,hatchback,maintance,mat,motor,sedan,service,service centre,spare parts,tyres
मोटारीची देखभाल - १ मोटार विकत घेण्यापूर्वी ती मोटार आपल्याला सांभाळता येईल की नाही, भविष्यात तिचे आवश्यक सुटेभाग मिळतील की नाही, तिच्या देखभालीसाठी धावाधाव करावी लागणार नाही ना, आदी दुरूस्ती, देखभालीबाबतही सर्व अंगानी विचार करणे हे प्रत्येक ग्राहकाच्या दृष्टीने गरजेचे आहे. अनेकदा मोटारीच्या सुखासाठी मोटार घेताना तिचे भविष्यातील फायदे व...