वाहन उद्योगावर मंदीचे सावट पडल्याचे उद्योजकांचे मत आहे. पण भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने आकडेवारीनिहाय विचार केल्यास एक हजार लोकांमागे फक्त नऊ जणांकडे वाहने आहेत, असे गणित मांडून वाहन उद्योगाच्या वाढीला वाव आहे, असे म्हणणारे वाहनउद्योगांमधील अधिकारीही कोणत्या प्रकारच्या व्यवसायाची वृद्धी करू इच्छित आहेत असा प्रश्‍न पडतो. कारण शहरी व ग्रामीण भागात वाहन घेणारे व त्यांना ते सर्व बाजूंनी परवडणारे असे किती जण आहेत, असा प्रश्‍न आहे. साहजिकच वाढत्या मंदीचा परिणाम जसा उद्योगांवर होणार आहे, तसाच तो ग्राहकांच्या संख्येवर होणार आहे. स्वत:चे वाहन ही गरज असणार्‍यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तशी कमी आहे. तर गरज आहे, असे म्हणणार्‍यांमध्येही ते केवळ गरज, म्हणून पाहिले जात नाही, तर ते परवडत आहे की नाही, हे देखील पाहिले जाते. नागरी भागात दर ३-४ वर्षांनी वाहने बदलणारे अनेक लोक आहेत पण ते प्रमाणही आता कमी होत चालले आहे. साहजिकच वाहन हे विशेष करून मध्यमवर्गीयांना परवडू लागल्याने ग्राहकांची संख्या वाढली होती. त्यांना वाहन ही चैन नव्हे तर गरज आहे असेही वाटू लागले होते, परंतु उत्पन्न, चांगले रस्ते, पार्किंगची सोय आणि देखभाल खर्च, सुटे भागादी बाबींचा विचार करता वाहन अधिकाधिक काळ टिकेल कसे हे पाहाणार्‍यांची संख्याही वाढत आहे.

भारतात अजून स्क्रॅप पॉलिसी आणलेली नाही, त्यामुळे वाहनांचा वापर अधिकाधिक काळासाठी होऊ शकतो, त्यासाठी वाहन देखभालीने चांगले ठेवता येऊ शकते, हा विचार तसा सर्वसाधारणपणे रुळलेला नाही. त्यामुळे आणि उत्पन्नाचे मार्ग वाढल्याने उत्पन्नही वाढू लागले आहे. पण त्याचा वापर वाहन वापरासाठी कसा करावा, दर ३-४ वर्षांनी वाहन नवे खरेदी करावे का याबद्दल गंभीरपणे विचार लोकांनी म्हणावा तितक्या प्रमाणात केलेला नाही. वाहन म्हणजे चैन म्हणूनही काही लोक बघतात. त्यात ते नीट ठेवण्यासाठी वाहनाची देखभाल करण्यासाठी वेळ देणे जमत नाही, असे म्हणणारे ग्राहकही आहेत. तरीही ग्रामीण भागात वाहनांचा वापर अधिकाधिक काळ करणारे ग्राहक जास्त आहेत, हे दिसून येते. नवे ग्राहकही तेथे वाढले आहेत, ही बाब उद्योगाच्यादृष्टीने तशी स्वागतार्ह आहे.

आता मूळ विषय जो आहे तो वाहनांचा वापर अधिकाधिक काळ करावा की ३-४ वर्षांसाठी नवे वाहन घेतले की नंतर दुसर्‍याला विकून टाकले; अशा प्रकाराने वाहन उद्योगाच्यादृष्टीने बाजारपेठेत परिणामकारक घडामोडी घडू शकतील. परंतु त्यामुळे ग्राहकाच्या खिशाला चाट किती बसेल, याचा विचारही या संबंधात वाहन उद्योगांनीही करायला हवा. सर्वसाधारणपणे वाढत्या किंमतींचा परिणाम ग्राहकावर होत असतो. हे खरे असले तरी वाढत्या मागणीनुसार वाहनाच्या सुट्या भागाच्या किमतीही काही प्रमाणात कमी व्हायला हव्यात. अनेक सुट्या भागांच्या किंमती पाहिल्या तर मनमानीपणे त्यांची किंमत ठेवलेली दिसते. प्रत्येक मोटार उत्पादक कंपनीच्या मालाची किंमत ही वेगळी तशात त्याच प्रकारचा माल तयार करणार्‍या अन्य सुटे भाग उत्पादक कंपन्यांच्या मालाची दर्जानुसार असणारी किंमत ही देखील वेगळी असतचे व कंपनीकडून अस्सल माल म्हणून विकल्या जाणार्‍या मालाच्या किमतीपेक्षा त्यांची किंमत अनेकदा कमी असते.

एकूणच सध्याच्या बाजारपेठेचा आणि तेेथे असलेल्या मालाच्या उठावाचा विचार करता व जागतिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय मोटारींच्या बाजारपेठेला इतकी उतरती कळा नक्कीच लागलेली नाही, असे म्हणावे लागेल. पूर्वीच्या तुलनेत मोटारींची संख्या अधिक आहे, ३-४ वर्षांमध्ये मोटारी विकून नवीन मोटारी घेणार्‍यांची संख्याही वाढलेली आहे, सुटे भाग तसेच न वापरता नवे भाग टाकण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. दुसर्‍या बाजूला इंधनाच्या वाढत्या किंमती, खराब रस्त्यांमुळे होणारी मोटारीची हानी आणि कमी मायलेज मिळण्याचे प्रमाण हे देखील कमी नाही. यामुळे मोटारीसाठी ३-४ वर्षांपेक्षा अधिक काळ देणारा ग्राहकही वाढणार आहे, किमान त्याची संख्या स्थिरावणार आहे. वाहनाचा वापर कायमस्वरुपी करणे, ही बाब तशी सहज सोपी नाही. याचे कारण तुमची मोटार मग ती, हॅचबॅक, सेदान वा एसयुव्ही असो, ती गुंतवणूक नाही, की त्यावर काही व्याजासारखी तुम्हाला रक्कम मिळत राहील. त्याचा वापर हा तुमच्या स्वत:च्या सुखासाठी आहे. वाहन ही मालमत्ता नव्हे, तर सुखोपभोग घेण्यासाठी असलेले साधन आहे, ते नीट राखण्याची जबाबदारीही त्यामुळे तुमच्यावर येते. त्याची किंमत, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ या बाबीही लक्षात घ्यायला लागतात. मोटारीची देखभाल सर्वांगानी व सर्वार्थांनी करावी लागते, तर ती मोटार तुम्हाला खर्‍या अर्थाने लाभते, सुख देते. आर्थिक बाजू भरभक्कम असणार्‍यांच्या बाबतीत मोटारी साधारण चार वर्षांनी बदलल्या जातात. त्यांच्याकडून होणारा मोटारी वापर काही वेळा फार मोठ्या प्रमाणात असतो, असेही नाही. तरीही त्या अशा पद्धतीने बदलण्याचा प्रघात काहींनी पाडलेला दिसतो. काही ग्राहक मोठ्या प्रमाणात मोटारीचा वापर करतात. शहरी जीवनातही मोटार वापरणे त्यांच्यादृष्टीने त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनलेला असतो. त्यामुळे रोज किमान २०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरही त्यांच्याकडून कापले जाते. अशांना मोटारींच्या दर्जाची व रस्त्यांच्या स्थितींचा सध्याचा भाग पाहिला तर चार वर्षांनी त्यांना मोटार विकून नवीन घेणे फायद्याचेही ठरते. अनेक जणांनी वापरानुसार असणारे अधिक अंतर लक्षात घेऊन इंधनावरील खर्च वाचविण्यासाठी सीएनजी या इंधनाचा वापर सुरू करण्याचे स्वीकारलेले आहे. या सीएनजी कीट बसविलेल्या मोटारींचा वापर चांगल्या प्रमाणात झाल्याने नंतर इंजिनाची होणारी हानी लक्षात घेऊन त्या भरपूर वापरानंतर विकल्या जातात. अनेकांना त्यांच्या वापराची मर्यादा लक्षात घेतली तर तशी विक्री व नव्याने दुसरी मोटार घेणे हे दर तीन वर्षांनीही परवडू शकते. सीएनजीच्या या मोटारींना रिसेल व्हॅल्यू फार मिळत नाही, हे देखील लक्षात घ्यायल हवे.

या सार्‍या बाबी लक्षात घेता मोटार कायमस्वरूपी वापरणार्‍यांना कशा प्रकारे देखभाल खर्च सांभाळावा लागतो, त्यांना कशा प्रकारे त्यासाठी वेळ द्यावा लागतो, या बाबी लक्षात घ्यायला हव्यात. त्यासाठी कोणती दक्षता त्यांनी घ्यायला हवी ही बाब देखील महत्त्वाची आहे. मोटारीचा वापर ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. एक म्हणजे मोटार विकत घेताना आपण ती किती पद्धतीने, मासिक सरासरी किती किलोमीटर चालविणार, त्यानंतर किती वर्षे वापरावयाची तुमची तयारी असणार या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. वर्षामध्ये सरासरी किती किलोमीटर मोटार चालविली जाणार आहे, ही बाब लक्षात घेणे महत्त्वाची ठरते. तुमचा मोटारीचा वापर दिवसाला, वर्षाला एकूण किती आहे, ते लक्षात घेऊन तुम्ही मोटार अधिकाधिक काळ नीट देखभालीसह वापरू शकता. त्यामुळे मोटारीमध्ये गुंतविलेले पैसे तुमच्या कष्टाचे असल्याने पुरेपूर वापर करून मोटार जास्त काळ व जास्त किलोमीटर होईपर्यंत वापरताना फायदेशीर ठरते. मोटार कमी काळ वापरून नंतर विकून दुसरी घेणे किंवा एक्स्चेंजमध्ये दुसरी मोटार घेणे असा प्रकारही अनेकांकडून होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे मोटार वापरणे एक तर आर्थिक बाजू भरभक्कम असणार्‍याना ते परवडू शकते किंवा जास्तीत जास्त वापर करणार्‍या मोटारींबद्दल ते परवडू शकते. जास्तीत जास्त वापर केल्यानंतर मोटारीवरील देखभालखर्च काहीसा वाढतो, तसेच मायलेज कमी होण्यास सुरुवात होते, मोटारीचे काही ना काही काम निघू लागते, अशावेळी ही मोटार विकून दुसरी मोटार घेणे हे किफायतशीर असते. या सर्व बाजू लक्षात घेतल्या तर मोटारीचा अशा प्रकारांनी वापर करणे ही गरजेची बाब आहे की चैनीची ते ज्याचे त्यांनी ठरवायचे असते. तरीही मोटारीचा किफायतशीर वापर होणे हे प्रत्येकाची गरज असते, हे विसरून चालणार नाही.

—-

http://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/vehicle-415x260.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/vehicle-415x260-150x150.jpgadminविशेष लेखauto,car,consumer,coustomer,hatchback,maintance,market,milege,motor,production,sedan,speed,suv,use of vehicle
वाहन उद्योगावर मंदीचे सावट पडल्याचे उद्योजकांचे मत आहे. पण भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने आकडेवारीनिहाय विचार केल्यास एक हजार लोकांमागे फक्त नऊ जणांकडे वाहने आहेत, असे गणित मांडून वाहन उद्योगाच्या वाढीला वाव आहे, असे म्हणणारे वाहनउद्योगांमधील अधिकारीही कोणत्या प्रकारच्या व्यवसायाची वृद्धी करू इच्छित आहेत असा प्रश्‍न पडतो. कारण शहरी व ग्रामीण...