स्वत:च्या वाहनाचे सुख कही औरच असते, असे अनेकांना वाटते. त्यात चूक नाही. प्रत्येकाच्या आर्थिक बळानुसार कोणती मोटार घ्यायची ते ग्राहक ठरवितात. त्यात कोणता प्राथमिक विचार करावयाचा ते अन्य लेखामध्ये नमूद केले आहे. त्यात आणखी पुढचा विचाचार म्हणजे वाहनाची तांत्रिकता, ही तांत्रिकता म्हणजे नेमके काय, ते पाहाणे गरजेचे आहे. किमान तांत्रिक बाजू समजून घेणे म्हणजे तुम्ही घेणार असलेल्या मोटारीची निवड करताना त्या मोटारीचा आकार तिचे रूपडे कसे आहे, हे पाहाणे नाही. तर त्या मोटारीचे इंजिन कसे आहे, कोणत्या कंपनीचे आहे, मोटार उत्पादक कंपनीचे आहे, की आणखी अन्य इंजिन बनविणार्‍या प्रख्यात कंपनीचे आहे. त्या इंजिनाची कामगिरी लोकांच्या अनुभवाला उतरली आहे का, मोटार बॅक व्हील ड्राइव्ह आहे, फ्रंट व्हील ड्राइव्ह आहे की, सर्व म्हणजे चारही चाके गती देणारी एसयुव्ही सारखी ४ व्हील ड्राइव्ह आहे हे पाहाणे. क्लच, गीअर, सस्पेंशन कोणत्या पद्धतीचे आहेत, हे पाहाणे अतिशय महत्त्वाचे असते. या तांत्रिक बाजूंची शहानिशा करून तुम्हाला त्या मोटारीकडून भविष्यात अपेक्षित असलेल्या कामगिरीचा अंदाज येऊ शकतो.
सर्वसाधारणपणे मोटार कुटुंबासाठी वा वैयक्तिक वापरासाठी घेताना इंजिन, सस्पेंशन, टायर्स, व्हील्स, क्लच, गीयर्स याच बरोबर आतील आसन व्यवस्था, त्या आसन व्यवस्थेमधील सोयी सुविधा, सामान ठेवण्यासाठी असलेली बूटस्पेस, वा डिक्की, दरवाजांमध्ये छोटे सामान ठेवण्यासाठी असणारे कप्पे, डॅशबोर्डची रुंदी, त्यावरील उतार, संगीत यंत्रणा वा अन्य सुविधा कशा आहेत, हे पाहाणेही गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला त्या सुविधा वापरताना त्रास होणार नाही, सहजपणा जाणवेल, जागा पुरेशी असेल, आसन व्यवस्थेमुळे प्रवासात आरामदायी रचनेचा लाभ घेता येईल, या सार्‍या गोष्टी पाहाणे आवश्यक आहे.
अंतर्गत रचनेबरोबरच बाह्य रचनाही पाहाताना मोटारीचा आकार केवळ सौंदर्य म्हणून नव्हे तर त्या आकाराची उपयुक्तता, वाहन चालविताना त्यासाठी येणारा अंदाज देणारी आहे का हे ही पाहावे. रात्रीच्यावेळी हेडलॅम्प प्रकाशझोत कशाप्रकारे देत आहेत, त्याचा अंदाजही घेणे गरजेचे असते. भारतीय रस्त्यांवर मोटार चालविताना असणारी स्थिती व त्या स्थितीला अनुकूलपणा आपल्याला त्या निवडणार्‍या मोटारीमुळे येतो की नाही, ते पाहावे. कारण मोटार घेतल्यानंतर किमान तीनते चार वर्षे तुम्ही मोटारीची हाताळणी करणार आहात. त्यापेक्षा अधिक काळ मोटार ठेवायची असेल, वापरावयाची असेल तर तुम्हाला त्या मोटारीचा पुरेपूर वापर करण्याच्यादृष्टीने मोटार निवडतानाच योग्य बाबींचा अंदाज येऊ शकतो.
तांत्रिक बाजू म्हणजे केवळ इंजिन, क्लच, गीयर्स, अल्टरनेटर या नव्हेत. तर एकंदर मोटारीच्या आरेखनाच्या अंगासह त्या तांत्रिकतेचा विचार केल्यास तुम्ही जास्त योग्य मोटारीची निवड व तुमच्या गरजा यांची सांगड घालू शकाल. प्रत्येक मोटारीची बनावट ही आरेखनाच्या विविध बाजूंसह केलेली असते. ती करताना त्या मोटारीचा वापर कोणत्या पद्धतीच्या वातावरणात कराल हे ही लक्षात घेतले जाते. कोणतीही उत्पादक कंपनी अशीच मोटार तयार करीत नाही, त्या मोटारीच्या विविध तांत्रिक, रचनात्मक, विद्युत क्रिया यांचे आरेखन केलेले असते. जसे एसयुव्ही मोटार ही कणखरपणे उभे केलेले उत्पादन वाटते. खराब रस्ता, डोंगराळ भाग, वालुकामय रस्ता, अतिचढ-उतार व उंचवटा यासाठी कशी उपयुक्त वाहन म्हणून ग्राहकाला वापरता येईल, त्यासाठी त्या मोटारीची रचना कशी असावी, तिचे इंजिन किती सक्षम असावे, टायर्स कोणत्या पद्धतीचे, रुंदीचे असावेत, याचा विचार करून त्या एसयुव्हीचे आरेखन केले जाते. अनेक एसयुव्हीते सस्पेंशन हार्ड (कणखर) असते, त्यामुळे खड्डे असणार्‍या रस्त्यांमध्ये तिची कामगिरी चांगली होऊ शकते. सस्पेंशन अधिक चांगले काम करते, टिकाऊ राहाते. पण या प्रकारच्या सस्पेंशन असणार्‍या मोटारींमध्ये मधील रांगेत म्हणजे चालकाच्या मागील रांगेत असलेल्या प्रवाशाला साध्या गतिअवरोधकावरून ताशी १० किलोमीटरच्या आत वेगाने जातानाही धक्का बसतो, उडायला होते. पण त्या मोटारीमध्ये वजन अधिक असेल तर तो त्रास नाहीसा होतो. हार्ड सस्पेंशन हे अशा प्रकारे काम करीत असते की त्यामुळे खराब रस्त्यावरून सातत्याने गेल्यावरही ते सस्पेंशन लगेच खराब होत नाही. ते सर्वसाधारण सॉफ्ट सस्पेंशन असणार्‍या सेदान, हॅचबॅक मोटारींच्या सस्पेंशनपेक्षा चांगली कामगिरी देते. त्यामुळे खराब रस्त्यांवर सातत्याने जाणार्‍या मोटारींमध्ये हार्ड सस्पेंशन असणार्‍या मोटारी या जास्त सक्षमपणे व अधिक काळ टिकाव धरू शकतात. त्यांचे सस्पेंशन ङ्गार काम काढत नाहीत. या उलट सॉफ्ट सस्पेंशन असणार्‍या मोटारींमध्ये प्रवाशांना खड्‌ड्यांमधून जाताना होडीत बसल्यासारखे हलायला होते, पण प्रवासी उडत नाही. बसल्याजागी तो उचलला जात नाही. त्यामुळे त्रास कमी होतो. काही मोटारींमध्ये तर खड्‌ड्यांमधून जाताना जाणवतही नाही. हा सारा सॉफ्ट सस्पेंशनचा प्रभाव आहे. पण, खराब रस्त्यांवरून सातत्याने जाणार्‍या मोटारींमध्ये ही सस्पेंशन असतात, ती लवकर खराब होऊ शकतात, ती बदलावी लागतात. त्यामुळेच तांत्रिक बाब विचारात घेताना आपण सर्वसाधारण कोणत्या रस्त्याचा वापर करणार आहोत, ते ग्राहकांनी नक्कीच विचारात घ्यायला हवे. मोटार घेतली व तीन-चार वर्षांमध्ये विकून टाकली, अशा प्रकारच्या ग्राहकांमधील पहिला ग्राहक तसा सुखी असतो. तो वापरून ती मोटारविकून टाकतो, पण त्यानंतरच्या ग्राहकाला मोटारीमध्ये मग त्रास सुरू होतात. त्यात सस्पेंशन, टायर्स, शॉक ऍब्सॉर्बर्स, स्प्रिंग्ज या खराब होतात, त्या बदलाव्या लागतात. तो खर्च कमी नाही, हे ही ग्राहकांनी विचारात घ्यायला हवे.
अतर्ंगत रचनेमध्ये आसन व्यवस्थाही महत्त्वाची बाब. त्यावर असणार्‍या आच्छादित सीट कव्हर्सच्याखाली कोणत्या प्रकारची रचना आहे, त्या मुडपून जागा करण्याची सोय आहे का, त्या मागे सरकणे, त्यांची पाठ पुढे मोडता येणे, मागील व पुढील आसने विशिष्ट रितीने मुडपून (ङ्गोल्ड करून) झोपण्याची सुविधाही असू शकते, तशा प्रकारच्या आसन व्यवस्थाही काही मोटारींमध्ये असतात. आसनांची उंची, सर्वसाधारण वापरणार्‍या ग्राहकाची वा त्यांच्या घरातल्या व्यक्तींची उंची किंवा त्या मोटारीचा नेहमी वापर करणार्‍या व्यक्तीची उंची या बाबींवर मोटारीतील आसने त्याला योग्य व आरामदायी आहेत का, त्या आसनांचा विविध पद्धतीने वापर करूनही ती आसन यंत्रणा नीट राहील का, मजबूत राहील का, याचा विचार मोटार विकत घेण्यापूर्वीच करणे हे केव्हाही चांगले. एकदा मोटार विकत घेतल्यानंतर मग नाराज होण्याची वेळ येऊ नये हे पाहाणे महत्त्वाचे आहे.
मोटारीमधील प्रवासी आसन व्यवस्थेप्रमाणेच चालकाच्या आसनामध्ये ते वरखाली करण्याची पुढे मागे करण्याची क्रिया करण्याची सुविधा असते. त्यामुळे चालकाला मोटार चालविताना नीटपणे बसून वाहन चालविण्यासाठी चालकाला स्वत:ला जुळविता येते. ही क्रिया हाताने वा विद्युत पद्धतीने करण्याची सुविधा मोटारींच्या कंपन्यांकडून मॉडेल्सनुसार दिली जाते. ग्राहकाला ही निवड करताना पूर्ण विचार करून सुविधा निवडण्याची गरज आहे. काहीवेळा मॅन्युअली (अतांत्रिक) पद्धतीने ही सुविधा घेणे पसंत केले जाते व नंतर त्या ऐवजी विद्युत मोटारीद्वारे केली जाणारी सुविधा हवीशी वाटते. तर काही वेळा विद्युत सुविधा असलेली ही आसन व्यवस्था नकोशी वाटण्याचाही अनुभव येतो. सांगायचा मुद्दा हा की, कोणतीही तांत्रिक सुविधा ही अद्ययावत असो की नसो ती स्वीकारताना तुमच्या गरजा, तुम्ही ज्या वातावरणात मोटार वापरणार आहात, त्या वातावरणाचा विचार करून मगच अशा पद्धतीच्या सुविधांची निवड करावी.
खिडक्यांच्या काचा बटनाद्वारे, विद्युत मोटरीच्या सहाय्याने खाली-वर किंवा बंद – उघडण्याची सुविधा दिली जाते. आरामदायीपणामधील ही सुविधा वापरण्यास खूप छान आहे, ज्याला पॉवर विंडो म्हणून ओळखले जाते. ती छान सुविधा आहे यात शंका नाही. पण एखादी सुविधा बंद होणे व बिघडणे, त्यावेळी पूर्ण मोटार तुम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये सोडावी लागते. अशावेळी तुम्हाला दुसर्‍या वाहनावर अवलंबून राहावे लागते. मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये अशा सुविधांची दुरूस्ती करुन देण्यासाठी एक-दोन दिवस जातात, पण ग्रामीण वा निमशहरी भागातील अनेक ठिकाणी सर्व्हिस सेंटर्स कमी आहेत वा तेथे अशा प्रकारच्या सुविधांसाठी सेवा देणारी झटपट यंत्रणा नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच भारतीय वातावरणात मोटार विकत घेताना तुम्ही या तांत्रिक सुविधा घ्यायच्या की नाही, ते प्रत्येकाने ठरविले पाहिजे. ज्याची त्याने आपापली गरज ओळखली पाहिजे.
मोटारचे इंजिन किती ताकदीचे आहे, त्या इंजिनाची कार्यक्षमता किती आहे की, ज्यामुळे तुमच्या मोटारीचे किमान मायलेज किती मिळू शकेल, त्याची कल्पना येईल. त्या मोटारीला असणार्‍या इंजिनची क्षमता लक्षात घ्या, त्याची ताकद लक्षात घ्या. डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन हवे असेल, तरी त्या मोटारीत बसविलेली डिझेल इंजिनची ताकद, त्याचा लोकांमध्ये असणारा अनुभव ( म्हणजे ती मोटार चालविणार्‍यांना मायलेज किती मिळते, चढाई असलेल्या मार्गावर मोटार सक्षमतेने चालते की नाही, त्यावर वातानुकूलीत यंत्रणा लावल्यानंतर किती दाब येतो) आदींबाबत चौकशी करा, त्यासंबंधात जाणकारांकडून मार्गदर्शन जरूर घ्या. मोटारीची कंपनी म्हणजे तिच्या ब्रँडवर केवळ लक्ष ठेवू नका. प्रत्येक मोटार ही त्या त्या कंपनीची ब्रँडेडच आहे. तेव्हा ती ब्रँडेड मोटार तुम्ही घेता, ती लोकानुभवावरही कशी आहे, त्याचा आढावा घ्या.
मोटार खूप छानदिसते पण हेडलॅम्प रात्रीच्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूची कडा नीट दाखवू शकत नाहीत, असा अनुभवही काही मोटारींमध्ये येतो. काहीवेळा ऍडजेस्टमेंटवर ती बाब अवलंबून असते. पण काहीवेळा त्या मोटारीच्या हेडलॅम्पची रचनाच अशी असते, की जी त्रासदायी ठरू शकते. भारतातील बहुतेक रस्ते हे विभाजक नसलेले असल्याने अशा रस्त्यांवरून मोटार रात्रीच्यावेळी चालविताना समोरून येणार्‍या मोटारीचे हेडलॅम्प तुमचे डोळे दिपवून टाकतात. अशावेळी तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूच्या रस्त्याच्या कडांचा अंदाज येणे गरजेचे असते. पण तो येत नसल्यास अशा प्रकारचे हेडलॅम्प केवळ सौंदर्यपूर्ण असतीलतर ते कामाचे नाहीत, हे पक्के लक्षात ठेवा.
एकूणच तांत्रिक बाब मोटार विकत घेण्यापूर्वी लक्षात घेणे अशा विविध घटकांवर अवलंबून आहेत, त्यामुळे मोटारीचे खरे उपयुक्त स्वरूप तुमच्या पसंतीला, परीक्षेला उतरते की नाही, ते तुम्हाला ठरविता आले पाहिजे. मग तुम्ही घेत असलेली मोटार हॅचबॅक असो, एसयुव्ही असो, सेदान असो की साधीसुधी व्हॅन असो. मोटारीच्या या तांत्रिक उपयुक्ततेकडे दुर्लक्ष होता कामा नये. मोटारीचे बाह्य सौंदर्य म्हणजे सर्वस्व नाही तर तिचे अंतर्गत गुण महत्त्वाचे असतात, हे ध्यानात घेऊनच तुमचा निर्णय ठरवा.
—-
http://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/admin-ajax.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/admin-ajax-150x150.jpgadminविशेष लेखbrand,car,central locking,clutch,dashboard,deeper,design,dikky,dipper,door,engine,garages,gears,hatchback,headlamp,maintance,mat,motor,power window,powertrail,seat,sedan,service,service centre,spare parts,suspension,suv,tail lamp,tyres,upper,van,wheels
स्वत:च्या वाहनाचे सुख कही औरच असते, असे अनेकांना वाटते. त्यात चूक नाही. प्रत्येकाच्या आर्थिक बळानुसार कोणती मोटार घ्यायची ते ग्राहक ठरवितात. त्यात कोणता प्राथमिक विचार करावयाचा ते अन्य लेखामध्ये नमूद केले आहे. त्यात आणखी पुढचा विचाचार म्हणजे वाहनाची तांत्रिकता, ही तांत्रिकता म्हणजे नेमके काय, ते पाहाणे गरजेचे आहे. किमान तांत्रिक...