आज शहरी व निमशहरी भागांमध्ये स्कूटर्स, मोटारसायकली यांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. हे वाहन घेण्यापूर्वी ग्राहकाने आपल्या गरजेचा विचार करावा हे अतिशय महत्त्वाचे आहे. याचे कारण आज उपलब्ध असणार्‍या मोटारसायकली व स्कूटर्स या वाहनांना अनेक ग्राहकांच्यादृष्टीने चैन म्हणता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही असेही हे वाहन वापरणे हे चैन ठरू नये किंवा महागडे ठरू नये. केवळ छान दिसणारे वा छान भासणारे दुचाकीचे रूपडे मोहात पाडू शकेल, इतकी सुबकता आज प्लॅस्टिकच्या वापरामुळे आणली गेली आहे. त्या मोटारसायक वा स्कूटरीचा आकार देण्याच्या कामात प्लॅस्टिकने मोठी भूमिका बजावली असली तरी त्यामुळे उत्पादकाला कमी पडणारे त्याचे मूल्य ग्राहकाला अनेक बाजूंने फायदेशीर ठरत नाही. अशा प्रकारच्या अनेक बाबी ग्राहकांना आकर्षित करणार्‍या असल्या तरी किफायतशीर नाहीत. तसेच सर्वच भारतीयांना अजूनही दुचाकी हे काही परवडणारे आहे, असेही नाही. हे दळणवळणाचे एक सुकर साधन आहे, इतकेच. ज्याने त्याने आपल्या खिशाच्या भाराप्रमाणे निवड करावी इतकेच. फक्त ती करताना ती चैन नाही हे मात्र नक्की लक्षात घ्यावे.
गरज की चैन 
आज विविध प्रकारच्या आकाराच्या  स्कूटर्स, मोटारसायकली वा स्कूटी, मोपेड्सनी ग्राहकांना भुरळ घातलेली आहे. या दुचाकींच्या आवश्यकतेविषयी ग्राहकाने विचार करायला हवा, तितका केलेला दिसत नाही. तरुणांना भुरळ घालणार्‍या मोटारसायकलींची निर्मिती करण्यात अग्रेसर असण़ार्‍या उत्पादक कंपन्यांनी या दुचाकींचा दीर्घकाळासाठी लोकांनी वापर करावा, असा विचार केलेला आहे, असे अजिबात दिसून येत नाही. त्यांचे आरेखन, त्यांची रचना, त्यामध्ये वापरण्यात येणारे भाग व त्यांचा दर्जा, विक्रीनंतरची उपलब्धता व त्यांची किंमत तसेच सेवाकेंद्राच्या जाळ्यांमधून होणारी लूट या बाबी, अनेक कंपन्यांनी डोळेझाक करून ग्राहकांच्या माथी मारलेली आहे. विशेष करून तरुणवर्ग हाच लक्ष्य करण्यात आला आहे. अर्थात ते स्वाभाविक असले तरी दुचाकींच्या किंमती आज ५० हजार रुपयांच्या आत पडत नाहीत, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. बर्‍याच दुचाकी धारकांनी कर्ज काढून दुचाकी घेतल्या असल्याचे दिसते. यामुळेच दुचाकींची ही उलाढाल लक्षात घेता ग्राहकांनीही पुरेपूर वापर करायला हवा. बाजारपेठेत दिसण़ार्‍या नवनव्या मॉडेल्सच्या भुलभुलैय्यामध्ये हरवून जायला नको, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
मोटारसायकल – मोटारसायकलींचा विविधांगी वापर त्या त्या भागानुसार कसा केला जातो. मोटारसायकल विकत घेताना काही बाबी सुरक्षिततेबरोबरच किफायतशीरपणा, टिकाऊपणा या दृष्टीने पाहाणे गरजेचे आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे स्कूटर्सपेक्षा अधिक मायलेज देणारे वाहन म्हणून मोटारसायकलींना अधिक मागणी असते. मात्र सर्वसाधारण स्कूटरपेक्षा तिची किंमत अधिक असते. झटकन वेग घेणे, आकर्षक रचना, प्रखर दिवे, मोठी चाके, प्रभावी ब्रेक्स अशा रचनांमुळे स्कूटर्सपेक्षा मोटारसायकल वापराचे प्रमाण वाढले आहे. सर्वसाधारणपणे हुशार ग्राहक मायलेज व त्यामुळे पडणारा आर्थिक फरक लक्षात घेतो. पण त्याचबरोबर मोटारसायकल अधिकाधिक प्रमाणातही वापरतो. त्यामध्ये अनेकांचे लक्षा नीटपणे देखभालीकडे असतेच असे नाही. काही ना काही प्रमाणात पैसे कसे वाचतील या मानसिकतेमधून सर्वसाधारण १०० ते १२५ सी सी ताकदीच्या मोटारसायकली वापरणारे ग्राहक हे देखभालीमध्ये आवश्यक तेव्हा सुटे भाग बदलण्यामध्ये टाळाटाळ करीत असतात. अगदी नियमितपणे इंजिन ऑइल बदलण्यामध्ये कंजूषपणा किंवा दुर्लक्ष करणारे ग्राहक कमी नाहीत. आपल्या वाहनाकडे असे केलेले दुर्लक्ष मोटारसायकलीच्या आयुष्याचे नुकसान करणारे असते.पर्यायाने ती मायलेजला कमी पडायला लागल्यानंतर किंवा सस्पेंशन्सचा त्रास वाढणे, टायर्स खराब होणे, गीयर्स नीट न पडणे, चेन तुटण्याचे प्रमाण वाढणे, लोखंड गंज पकडण्यास सुरुवात होणे अशा प्रकारांनी कंटाळून ती विकून टाकली जाते, असे सध्या मोटारसायकलधारकांच्या मानसिकतेचे स्वरूप दिसते.
 १०० ते १२५ सीसी ताकदीच्या मोटारसायकली या प्रामुख्याने वापरणारा ग्राहक हा व्यावसायिक, नोकरदार आणि अधिकाधिक वापर करणारा असतो. त्याच्यादृष्टीने त्याची पहिली मोटारसायकल असेल तर तो ती अधिक काळजी घेणाराही असतो. पण कालांतराने त्या मोटारसायकलीचा वापर कमी झाल्यानंतर ती पडून राहिल्याने तिचे गंजणे सुरू होते. यामुळे ती विकण्याशिवाय मोटारसायकलीच्या मालकाला चैन पडत नाही. मुळात या ताकदीच्या मोटारसायकली या खूपच उपयुक्त आहेत. मायलेजच्या दृष्टीने, सुट्या भागांच्या बदलांसाठी, हायवे व शहर या दोन्ही ठिकाणी किफायतशीरपणा देणार्‍या या मोटारसायकली साधारण नोकरदारांनाही फायदेशीर पडतात. त्या चांगल्या पद्धतीने वापरल्या गेल्या, ४० ते ५० किलोमीटर ताशी वेगाने चालविल्या गेल्या तर अधिक मायलेज मिळते व अन्य फायदेही त्यातून होत असतात. अशा प्रकारच्या वापरातून गरजवंताला फायदा नक्की असतो. यामुळेच या ताकदीच्या मोटारसायकलींचे प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणात दिसून येते. १०० ते १२५सी सी ताकदीची मोटारसायकल ही आज नक्कीच गरज बनली आहे. पण त्यासाठी आवश्यक आहे ती तिची योग्य निगा, योग्य व संतुलीत वेग, वेळच्यावेळी सुट्या भागांची निगा व बदली केली जाणे गरजेचे आहे. तरच ही मोटारसायकल चैन ठरणार नाही.
आज मोटारसायकलींमध्ये अधिक ताकदीच्या मॉडेल्सनेही मायलेज बर्‍यापैकी राखले आहे. पण तरीही त्यांच्या एका ठराविक काळानंतर ते कमी होते. त्यांच्या दिसण्याने ग्राहक खूष असतो, हे मात्र नक्की. मात्र अशा प्रकारच्या खास करून १७५ ते ३५० सी सी ताकदीच्या मोटारसायकली या दोन प्रकारांमध्ये आढळतात. काही पारंपरिक, लष्करी दणकटपणा असलेल्या तर काही अधिकाधिक तंत्रकुशल आरेखनाने साकारलेल्या. यामध्ये दणकटपणा असलेल्या फार मायलेज देत नाहीत पण चालविण्यातील सुख, रुबाब देतात. तर आरेखनाने अधिक तंत्रसिद्ध असल्याने मायलेजही ताकदीच्या तुलनेत बर्‍यापैकी असते. अर्थात असे असले तरी त्यांची निगा राखणे हे सर्वात नाजूक काम असते हे लक्षात घ्यायला हवे. भारतासारख्या देशातील रस्ते व वाहतूकस्थिती व वातावरण यांचा विचार करता मोटारसायकल ही एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेणार्‍या साधनांमधील एक आवश्यक गरज ठरली आहे. विशेष करून १०० ते १२५ सी सी ताकदीच्या मोटारसायकली या सर्वसामान्यांपर्यंत खर्‍या उपयुक्ततावादी दृष्टीने पोहोचल्या आहेत. मात्र त्यांचा वापर करताना, हाताळणी करताना तुम्ही जितके दक्ष राहाल, तितकीच त्यामोटारसायकलीची चैन अनुभवाल हे नक्की
(पूर्वार्ध)

 

 

 

http://wegvan.in/wp-content/uploads/2015/02/scooters-wv-1-e14228485759171.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2015/02/scooters-wv-1-e14228485759171-150x150.jpgadminदुचाकीengine,headlamp,motorbike,scooter,scooty,two wheelers
आज शहरी व निमशहरी भागांमध्ये स्कूटर्स, मोटारसायकली यांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. हे वाहन घेण्यापूर्वी ग्राहकाने आपल्या गरजेचा विचार करावा हे अतिशय महत्त्वाचे आहे. याचे कारण आज उपलब्ध असणार्‍या मोटारसायकली व स्कूटर्स या वाहनांना अनेक ग्राहकांच्यादृष्टीने चैन म्हणता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही असेही हे वाहन वापरणे...