ठळ्ळ्..खळ्ळ …असा आवाज आणि इतस्तत: विखुरणारे तुकडे-काच फुटल्यावरच्या अगदी स्वाभाविक गोष्टी! यात नवखे असे काहीच नाही. पण गाडीची समोरची काच फुटली तर मात्र असे घडताना दिसत नाही. ती फुटली तरी सर्व तुकडे तिथेच राहतात व कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे नक्षी तयार करतात. आहे ना नवल ? तर या विशेष काचेबद्दल जाणून घेऊया.

फुटल्यानंतरही न विखुरणा-या ह्या काचेला लॅमिनेटेड ग्लास असे म्हणतात आणि हा गुणधर्म तिला तिच्या रचनात्मक वैशिष्ट्यांमुळे प्राप्त झाला आहे. ही काच तयार करत असताना दोन काचेच्या थरांमधे एक प्लॅस्टिकचा म्हणजेच Construction of glass(Advameg, Inc.)‘पॉलिव्हीनील ब्युटीरल’चा थर असतो. ह्या थरामुळे काच फुटली तरी तिचे तुकडे होउन न विखुरता ते एकाच ठिकाणी जोडलेले राहून जाळीदार रुपात दिसतात. त्यामुळे वाहनातील व वाहनाजवळील व्यक्तींना काचेचे तुकडे लागून होणारी इजा टाळली जाते. अशा काचा वापरण्यापूर्वी जेव्हा साध्या काचा वापरल्या जात असत तेव्हा अपघात समयी काचांचे तुकडे लागल्यामुळे प्रवाशांना जास्त इजा झाल्याचेही दाखले सापडतात. लॅमिनेटेड काचांचा वापर वाढल्यापासून गाडी उलटण्यासारख्या गंभीर स्वरूपाच्या अपघातातही गाडीतील माणसांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे.
आश्चर्याची गोष्ट ही की ह्या काचेचा शोध चुकूनच लागलेला आहे. सन १९०३ मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ एडूओर्ड बेनेडिक्टस प्रयोगशाळेत काम करत असताना एका काचेच्या भांड्यावर चुकीने प्लॅस्टिकचा थर बसला. हे भांडे जेव्हा खाली पडले तेव्हा ते न फुटलेले बेनेडिक्टस यांनी पाहिले. त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली व लॅमिनेटेड काचेचा जन्म झाला. आता जवळ-जवळ साठ वर्षे ही काच वाहन उद्योगात वापरली जात आहे.
सुरक्षेच्या सर्वात महत्त्वाच्या फायद्याबरोबरच ह्या काचेचे काही अन्य फायदेही आहेत. ते म्हणजे-
१)रचनेप्रमाणे मधला थर प्लॅस्टिकचा असल्यामुळे ह्या काचेतून आवाज कमी प्रमाणात आरपार जातो. ह्यामुळे इंजिनचा तसेच बाहेरील अन्य आवाज प्रवासी कक्षापर्यंत साधारणपणे ५० टक्के  इतके कमी पोहोचतात.
२)लॅमिनेटेड काचेतील प्लॅस्टिक आवाजाबरोबरच तापमानालाही अवरोध करते. सूर्यप्रकाशात असलेली इन्फ्रारेड किरणे या काचा ९९ टक्क्यांपर्यंत परावर्तित करतात. परिणामत: गाडीतील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा थोडेसे कमी राहते.
वरील फायद्यांमुळे प्रवाशांना आरामदायी सफरीचा आनंद लुटता येतो. ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करुन पुढच्या काचेबरोबरच बाजूच्या व मागच्या काचांसाठी लॅमिनेटेड काच वापरण्याचा विचार वाहन उद्योग करत आहे.
परंतु वाहनाच्या सर्व काचांमधे लॅमिनेटेड काच वापरण्याचा एक तोटादेखील आहे आणि तो म्हणजे आपात्कालीन सुटकेसाठी होणारा त्रास. लॅमिनेटेड काचेच्या गुणधर्माचा म्हणजेच लवकर न तुटण्याचा तोटा होतो तो इथे! काच लवकर फुटत नसल्याने गाडीत अडकलेल्या माणसांना बाहेर पडण्यासाठी फार त्रास होतो किंबहुना बरेच वेळा ते शक्य होत नाही व अशा प्रसंगात ज़ीवितहानीसुद्धा होऊ शकते. यामुळेच गाडीतील सर्व काचांसाठी लॅमिनेटेड काच वापरावी का हा अजूनही वादाचाच मुद्दा आहे! जर काच आतून जलद गतीने व कमी श्रमात फोडण्यासाठी काही सोय करता आली जसे की एखादा हातोडा किंवा तत्सम अवजार पुरवणे तर मात्र सर्व काचांसाठी लॅमिनेटेड काच वापरणे सोयीस्कर व सुरक्षित ठरेल.
http://wegvan.in/wp-content/uploads/2015/07/Broken-Car-Windshield-ClearPlex-Corp..jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2015/07/Broken-Car-Windshield-ClearPlex-Corp.-150x150.jpgadminसाधन-सामग्रीglass,lamineted glassm
ठळ्ळ्..खळ्ळ ...असा आवाज आणि इतस्तत: विखुरणारे तुकडे-काच फुटल्यावरच्या अगदी स्वाभाविक गोष्टी! यात नवखे असे काहीच नाही. पण गाडीची समोरची काच फुटली तर मात्र असे घडताना दिसत नाही. ती फुटली तरी सर्व तुकडे तिथेच राहतात व कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे नक्षी तयार करतात. आहे ना नवल ? तर या विशेष काचेबद्दल जाणून...