कारचा पत्रा हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. बाह्यपत्रा हा तर चांगला जाड हवा असे अनेकांना वाटते पण त्याची खरोखरीच गरज आहे का, असा प्रश्न पडलो. त्याबाबतचा उहापोह करणारा हा लेख खास वेगवानच्या वाचकांसाठी देत आहोत.

आजमितीस भारतात अंदाजे ३५ वेगवेगळ्या कंपन्या आपल्या कार्स विकतात. अशा सर्व कार्सची माहिती, म्हणजे अगदी इंजिनपासून ते अॅक्सेसरीजपर्यंत सर्व, अनेक ब्लॉग्स व साईट्सवर उपलब्ध असते. ह्याव्यतिरिक्त ऑटोमोबाईल ह्या विषयाला वाहिलेली अनेक नियतकालिकेसुद्धा आपले ज्ञान अद्ययावत ठेवतात. ह्यामध्ये गाडीचे इंजिन, चेसीज, सस्पेन्शन, इंधन सरासरी (इंधन-क्षमता), बाह्यरूप अन् अनोखे रंग, स्टाईलिंग, पर्यावरणमान्यता, सुरक्षामानांकन, नावीन्यपूर्ण वैशिष्ठ्ये, इतर गाड्यांशी स्पर्धात्मक तुलना वगैरे असंख्य बाबींचा समावेश असतो. ह्यात एक अडचण अशी असते की, ह्यामध्ये बऱ्याचवेळेस  फारच प्रगत माहिती दिली जाते. उदा. एखाद्या गाडीच्या परिक्षणामध्ये “आता ह्या मॉडेलमध्ये हायड्रोलिक पॉवर स्टेरिंगचा अंतर्भाव करण्यात आला आहे” अशी माहिती दिली जाते व त्यामुळे ड्रायव्हरचे किती कष्ट कमी झाले हे अधोरेखित केले जाते. त्यासाठी पूर्वीच्या व आताच्या स्टिअरिन्ग-टॉर्कमध्ये किती फरक पडला ह्याचीही आकडेवारी दिली जाते. परंतु इथे मुळात सर्वसामान्य वाचकांना हेच माहित नसते की, पॉवर स्टिअरिंग म्हणजे काय? गाडीमध्ये कोणकोणत्या प्रकारची स्टिअरिंग्ज असू शकतात? त्यांचे कोणकोणते फायदे असतात? वगैरे, वगैरे, वगैरे… शिवाय, ही सर्व माहिती अथवा ज्ञान प्रामुख्याने इंग्रजीतच उपलब्ध असते.जेव्हा ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तेव्हा वाटले की, सर्वसामान्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत आणि तीही मराठीतच, असे काहीतरी करायला हवे. सर्वसामान्य लोकांना अनेकवेळा गाड्यांच्यासंदर्भात काही  प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा ते अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. पण त्यांना सापडलेली उत्तरे बहुदा ऐकीव माहितीवर तरी असतात किंवा भ्रामक समजुतींवर बेतलेली असतात. उदाहरण म्हणून हे खालील नमुनेदार प्रश्न पहा….

१)  मोटारीच्या बाह्य पत्र्याचे महत्त्व किती?

२) सुरक्षित अशा मोटारीसाठी पत्र्याचा गेज (जाडी) नेमका किती चांगला?

३) मोटारीचा जाड पत्रा अपघातसमयी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त असतो का?

४)  पत्र्याचा पातळ गेज असणे मोटारीचे वजन कमी करतो, पण त्याचे इतर परिणाम काय असतात? मायलेज वाढते का, अपघातात सुरक्षितता कायम राहाते का, सुरक्षितता मिळते का?
वरील साऱ्या प्रश्नांतून एकच अर्थ निघतो, किंवा एकच प्रश्न काढता येतो –· मोटारीच्या बाह्यपत्र्याच्या जाडीचा, अपघातसमयी सुरक्षेसाठी कितपत फायदा होतो? गेल्या २० वर्षांतील गाड्यांमधील विकास पाहिला तर असे दिसते की, गाड्यांच्या विक्रीमध्ये इंधन सरासरीला सर्वाधिक प्राधान्य मिळते आहे. पण अशी काय परिस्थिती निर्माण झाली की, इंधन सरासरी ही वाहन विक्रीमध्ये प्रमुख निकष बनली? त्यासाठी स्वतंत्र भारतातील मोटारगाड्यांच्या इतिहासाची थोडीशी माहिती करून घेणे रंजक ठरेल. १९६० ते १९८० ह्या दोन दशकांमध्ये भारतात प्रामुख्याने फियाट व अॅम्बेसेडर ह्या दोनच गाड्यांचा दबदबा होता, किंबहुना त्यांची वाटून घेतलेली एकाधिकारशाही (monopoly) अथवा मनमानी होती. अर्थातच, फियाट व अॅम्बेसेडर ह्या विदेशी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांशी भागीदारी केलेली होती. फियाटची प्रीमिअर ऑटोबरोबर होती तर अॅम्बेसेडरची  हिंदुस्तान मोटर्सशी.  सर्व शासकीय, निमशासकीय व प्रशासनिक संस्था, अॅम्बेसेडर गाड्या निवडत असत तर खाजगी वापरासाठी ग्राहक फियाटला पसंती देत असत. इतरही काही गाड्या बाजारात होत्या जसे की, स्टॅंडर्ड, डॉज, वगैरे. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प होते. त्या काळात अतिश्रीमंत वर्ग, उदा. फिल्मस्टार, बडे राजकीय पुढारी, मोठे उद्योजक ही मंडळी आपल्या इतमामाला साजेशा गाड्या थेट परदेशातुनच आयात करत असत.१९८०च्या सुमारास मारुती उद्योग ह्या भारतीय कंपनीने सुझुकी ह्या जपानी कंपनीबरोबर एक दीर्घकालीन करार करून भारतामध्ये अद्ययावत अशा छोट्या मोटारगाड्या बनवण्याची योजना आखली. (करारानुसार पहिल्या काही टप्प्यात येणाऱ्या गाड्या ह्या जपानमधून थेट तयार होऊनच येणार होत्या.) गाडी छोटी व कमी ताकदीची असल्याने हिची किंमतही कमी असणार होती. किंबहुना मारुतीचे घोषवाक्यंच होतं “मध्यमवर्गीयांची कार”.  ह्या योजनेनुसार बनलेली पहिली मारुती सुझुकी गाडी १९८३मध्ये भारतात अवतीर्ण झाली. ह्या गाडीची त्यावेळेस दिल्लीतील किंमत होती फक्त ५२,५००/- रु. अशातऱ्हेने भारतात मध्यमवर्गीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी व त्यांचे जीवनमान उंचावून त्यांना उच्चमध्यमवर्गीय बनवणारी जीवनपद्धती निर्माण झाली. आणि ही जीवनपद्धती आता भारतात चांगलीच स्थिरावली आहे. परंतु, हा वर्ग प्रत्येक गोष्ट मोजून, मापून व पारखून घेत असल्याने (value for money), तसेच कंपन्यांना आपला व्यवसाय वाढवायचा असल्याने, गाड्यांची इंधन सरासरी हा कळीचा मुद्दा बनला.   ह्याबरोबरच, पर्यावरणाबद्दलची जागतिक चिंता व पारंपारिक भूगर्भ इंधनांचे झपाटयाने घटत चाललेले साठे    हेदेखील त्यामागचे एक कारण आहे. एकदा इंधन सरासरी हा प्रमुख निकष झाला आणि मग गाड्यांचे आरेखन करताना त्यासाठी सर्वथैव प्रयत्न सुरु झाले. इंधन सरासरी साधण्याकरिता सर्वात सोपा उपाय म्हणजे गाडीचे वजन कमी करणे, ज्यायोगे ती वाहून नेण्यासाठी कमी इंधनाची गरज भासेल. आजच्या भाषेत बोलायचे म्हणजे गाडीचे “Diet” करणे. गाडीमध्ये बाह्यपत्र्यांव्यतिरिक्त अंदाजे ८० ते ९० पत्र्याचे सुटे भाग असतात. त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे, बाह्यपत्र्याला ताकद देणे, तसेच गाडीमधील इतर जुळणींमध्ये सहभागी होणे किंवा जुळणीस सुविधा पुरवणे. अर्थातच, ह्या भागांचे वजन कमी करण्यापूर्वी अनेक कठोर चाचण्या करून खात्री करून घ्यावी लागते, की, एखादया पत्र्याची जाडी कमी करून चालेल का? त्यामुळे, गाडीच्या ताकदीमध्ये किंवा कार्यक्षमतेमध्ये कोणतीही न्यूनता तर येणार नाही? …आणि ह्यासाठी खूप मोठा कालावधी लागू शकतो.आणि म्हणूनच, गाडीचे वजन कमी करताना सर्वप्रथम गदा आली ती गाडीच्या  बाह्यपत्र्यावर. कारण स्पष्ट होते – बाह्यपत्रा हा फक्त गाडीच्या बाह्यरूप, रंगसंगती व स्टाईलिंगद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असतो आणि त्याव्यतीरीक्त त्याचे कोणतेही प्रमुख कार्य नसते. इंग्रजी परिभाषेत सांगायचे तर बाह्यपत्रा हे गाडीचे

वजन कमी करण्यासाठी गाडीच्या आरेखकांसाठी एक soft target होते. त्यामुळेच गेल्या २०-२५ वर्षांमध्ये बाह्यपत्र्याची जाडी जवळपास ५०%नी कमी झाली. उदा. १ ते १.२ मी.मी. जाडीचा बाह्यपत्रा आता ०.६ ते ०.६५ पर्यंत  आलेला आहे. ह्यामुळे गाडीच्या अंतिम सांगाड्याच्या वजनामध्ये लक्षणीय घट झाली. (वाहननिर्मितीच्या परिभाषेत गाडीच्या अंतिम सांगाड्याला इंग्रजीत BIW म्हटले जाते. BIW म्हणजे “Body In White”. म्हणजेच, गाडीच्या पत्र्यांच्या सांगाड्याची नट-बोल्ट व वेल्डीन्गसह केलेली जुळणी.) ह्याशिवाय एक अप्रत्यक्ष फायदा देखील झाला. तो म्हणजे, बाह्यपत्र्याची जाडी कमी झाल्याने, त्याचे उत्पादन करण्यासाठी कमी ताकदीची यंत्रसामुग्री पुरेशी झाली, ह्याद्वारे, बाह्यपत्र्याचे उत्पादनामूल्य (Production cost) देखील कमी झाले. सारांश, गाडीच्या बाह्यपत्र्याची जाडी कमी केल्याने झालेले फायदे म्हणजे –

गाडीचे निव्वळ वजन (Curb Weight) कमी झाले.

. ज्यायोगे गाडीची इंधनक्षमता (Mileage) वाढली.

गाडीचे उत्पादन मूल्य (Production Cost) कमी  झाले.

पर्यावरणपोषक अर्थात नैसर्गिक उर्जास्त्रोतांचे संवर्धन अथवा रक्षण.

उपरोक्त सर्व सुधारणांचा थेट फायदा ग्राहकाला मिळाला तसेच सुधारणा पर्यावरणपोषक असल्याने त्याद्वारे संपूर्ण समाजाचादेखील फायदा झाला. परंतु एक गोष्ट निश्चित, की, अपघातसमयी गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने बाह्यपत्र्याची जाडी जास्त असल्याने कोणताही फायदा होत नाही. पण मग प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अपघातामध्ये कोणत्या यंत्रणांचे कार्य जीवितहानी रोखू शकते? ह्याविषयी आपण पुढील लेखात माहिती घेऊ.

  • चंद्रशेखर बोडस  
  • मोबाईल संपर्क  ९९२२९७१४६५,
  • ई-मेल – cabodas@gmail.com
  •   (लेखक टाटा मोटर्समधील निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक असून सध्या IMTMA ह्या संस्थेसाठी sheet metal forming व संबंधित विषयांमध्ये ट्रेनिंग सेमिनार्स घेतात. त्याचबरोबर ह्याच विषयामध्ये इंजीनीरिंग कंपन्यांना  मार्गदर्शनही करतात.)
http://wegvan.in/wp-content/uploads/2017/08/car-body-1.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2017/08/car-body-1-150x150.jpgadminविशेष लेखcar steel body gauge outer curbweight production cost body
कारचा पत्रा हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. बाह्यपत्रा हा तर चांगला जाड हवा असे अनेकांना वाटते पण त्याची खरोखरीच गरज आहे का, असा प्रश्न पडलो. त्याबाबतचा उहापोह करणारा हा लेख खास वेगवानच्या वाचकांसाठी देत आहोत. आजमितीस भारतात अंदाजे ३५ वेगवेगळ्या कंपन्या आपल्या कार्स विकतात. अशा सर्व कार्सची माहिती, म्हणजे अगदी...