गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

   वाहन उद्योग : वर्तमान आणि भविष्य  - भाग ३ 

मोटारीप्रमाणे आज दुचाकीचे महत्त्वपूर्ण रूप विशेष करून आशिया खंडात पाहावयास मिळते. सर्वसामान्य जनतेचे वैयक्तिक, कौटुंबिक व व्यावसायिक असे वाहन म्हणजे स्कूटर, मोटारसायकल असे हे समीकरण बनले आहे. यामुळे भारतात एकूण वाहनांच्या विक्री-वापर या तुलनेचा विचार करता भारतीय बाजारपेठेत तर सुमारे ७० टक्क्यांचा वाटा या दुचाकींनी उचललेला दिसतो.


दुचाकी- मोटारसायकल- स्कूटर



दुचाकीच्या निर्मितीचा आढावा घेताना तीन प्रकारांकडे लक्ष द्यावे लागेल.त्यात मोटारसायकल, स्कूटर व तीनचाकी रिक्षा सदृशवाहने, या तीन प्रकारांच्या अनुषंगाने दुचाकीच्या इतिहासाकडे पाहावे लागेल. या साऱ्या प्रकाराची जननी होती ती म्हणजे सायकल. घोड्याद्वारे गाडी ओढून वाहतूक करण्याचे साधन म्हणजे घोडागाडी. या घोडागाडीऐवजी स्वयंचलित अशी गाडी बनविण्याचे स्वप्न १९ व्या शतकात पाहिले गेले. १८८४ मध्ये व्यावसायिकदृष्ट्या आरेखित करण्यात आलेले तीनचाकी स्वयंचलित वाहन ग्रेट ब्रिटनमध्ये एडवर्ड बटलर यांनी तयार केले. सिंगल सिलेंडरचे आडवे गॅसोलीन इंजिन पुढील चाकांदरम्यान बसविण्यात आले होते. मागील चाक एकच होते. पुढील चाके ही नियंत्रणासाठीही वापरता येत होती. ती चाके गाडीला गती देण्याचे काम करीत नव्हती तर या इंजिनातून मिळणारी गती मागील चाकाला देण्यासाठी एका साखळीद्वारे मागील चाकाला संलग्न करण्यात आली होती. इंधनाचे अंतर्गत ज्वलन केले जाऊन त्यातून तयार होणाऱ्या ऊर्जेचे परिवर्तन वाहनाला गती देण्यात होते.
एकंदर वाहनाला स्वयंचलित बनविण्यासाठी इंजिन ही एक आगळी यंत्रणा तयार होत होती. त्या काळात इंधन म्हणून वा ऊर्जा तयार करण्याचे साधन म्हणून वाफेचे इंजिनही वापरले गेले. एका तीनचाकी वाहनावर हा प्रयोग करण्यात आला होता. स्वयंचलित वाहन मग ते मोटार असो की सायकलसदृश वाहन असो; ती विकसित होण्याची क्रिया एका रात्रीत झालेली नाही. त्यात बराच काळ जावा लागला. त्यात सापडणाऱ्या गुण-दोषांचा विचार करून वाहनाचा विकास झाला. औद्योगिक क्रांतीने युरोपातील एकंदर जनजीवन कसे ढवळून निघत होते, त्याचे प्रत्यंतरच वाहनांच्या एकंदर निर्माण प्रक्रियेतून दिसून येते असे म्हणावे लागेल. वाहनाला ऊर्जा देणारे इंजिन हे महत्त्वाचे. या दुचाकी वाहनांना केवळ उपयुक्ततेचे साधन म्हणून नव्हे तर क्रीडा स्पर्धेतील एक उल्हासी व उत्साही वाहन म्हणूनही फार महत्त्व प्राप्त झालेले दिसते. लष्करी कामातही मोटारसायकलींनी फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये या दुचाकींमुळे दळणवळण व संपर्काची अनेक कामे फत्ते करण्यात त्या त्या देशांच्या जवानांनी बाजी मारली होती.
युरोपमध्ये साधारण पहिल्या जागतिक महायुद्धात सशस्त्र दलाच्या सर्व प्रकारच्या तुकड्यांमध्ये, शाखांमध्ये मोटारसायकलींचा वापर झाला. त्यानंतर त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली. त्यानंतर पहिल्या जागतिक मंदीपर्यंत मोटारसायकलींच्या वापराचा, खेळातील सहभागांचा आनंद चांगलाच लुटलाही गेला. दुसऱ्या महायुद्धानंतरही या मोटारसायकलींचा वापर सर्व स्तरावर होऊ लागला. त्यानंतर झालेल्या संशोधनांमधील प्रगतीनुसार मोटारसायकलीचे रूप बदलत गेल. शर्यतींमधील मोटारसायकल, पर्यटनासाठी वा प्रवासासाठी मोटारसायकल असा विविध दृष्टीने वापर होत गेला.
सायकलीला स्वतंत्रपणे इंजिन लावून त्या सायकलींचा मोटारसायकलीसारखा वापर करण्याचा युरोपातील काही भागांमध्ये असलेला वापरही लक्षणीय होता. अशा पद्धतीच्या सायकलच्या वापरामधूनच हलक्या वजनाच्या मोटारसायकलीही बनवून विकसित करता येतात, याची जाण संशोधकांनाही झाली असावी. १९ वे शतक हे एकूणच वाहनविकासाच्या दृष्टीने लक्षणीय म्हणावे लागते.
१९०० मध्ये अनेक प्रकारच्या सायकलींना लहान मोठ्यो स्पार्क इग्निशनची इंजिने बसविण्याचे प्रयत्न केले गेले. या साऱ्या प्रयत्नांना एक विश्‍वासार्हता हवी यासाठी रस्त्यावर या प्रकारच्या गाड्यांची चाचणी घेण्यात आली, स्पर्धात्मक अशी ही चाचणी होती. यासाठी १९०७ मध्ये टुरिस्ट ट्रॉफी स्पर्धा आयोजिण्यात येत होत्या. अशा प्रकारच्या स्पर्धात्मक कार्यक्रमांमुळे नवीन कल्पना पुढे येत होत्या. त्यातून टू स्ट्रोक सायकलीचे आरेखन झाले व बहुव्हॉल्व इंजिन एरोडायनॅमिक आकाराची कार्बन फायबर शरीराची रचनाच त्या मोटारसायकलीला प्राप्त झाली. १८८५ मध्ये गॉटेलीब डैमलर व विलहेल्म मेबॅच यांनी जर्मनीमध्ये गॅसोलीन इंजिन असणारी पहिली मोटारसायकल तयार केली, जी दुचाकी होती. ही दुचाकी मोटारसायकलीची नांदी म्हणावी लागेल. सर्वसाधारण सायकलीची रचना होती इतकेच, पण शास्त्रीय दृष्टीने तत्कालीन सायकलीपेक्षा ती खूप वेगळी होती. वाफेवर चालणारी दुचाकी ही मोटारसायकल म्हणून विचारात घेतली तर त्याचे पहिले श्रेय सिशॉक्सपेरॉक्स या फ्रेन्च व्यक्तीला द्यावे लागेल. त्यानंतर त्या पद्धतीमधील वाहन १८६९ मध्ये सिल्व्हेस्टर एच. रोपर रॉक्सबेरी या मॅसेच्युसेट्‌स येथील संशोधकाने तयार केले होते. तो त्याचे हे यांत्रिंक वाहन सर्कशीत व जत्रेमध्ये लोकांना दाखवीत होता. अमेरिकेत १८६७ मध्ये त्याने ते लोकांसमोर या जत्रांमधील सर्कशीच्या माध्यमातून आणले. काही असले तरी पेट्रोजन्य पदार्थाचा इंधन म्हणून वापर केला गेलेली मोटारसायकल ही पहिली मोटारसायकल म्हणून गणतीत घ्यावी लागेल. मोटारसायकलीची पहिली निर्मिती कोणी केली तर त्याचे श्रेय डैमलर यांच्या रैटवॅगन या वाहनाला द्यावे लागते. १८९४ मध्ये हिल्डब्रॅण्ड आणि वुल्फ म्युल्लर यांनी प्रथम पिढीतील मोटारसायकलीचे उत्पादन सुरू केले, ज्या वाहनाला मोटारसायकल म्हणून मानले गेले. कारण सुरुवातीच्या काळात सायकलींना इंजिन जोडून त्यांना मोटारसायकलीचे रूप व गुण देण्याचा प्रयत्न होत होता. त्याचप्रमाणे संशोधकांचेसुद्धा विषय व क्षेत्र बदलत होते. १९ व्या शतकातील ही गोष्ट आहे. कारण ज्यांनी सुरुवातीला मोटारसायकलींसंबंधात काम केले असे संशोधक अन्य संशोधन विषयांकडे वळले होते. याचेच एक उदाहरण म्हणजे डैमलर व रोपर हे दोन संशोधक चारचाकी वाहनाच्या क्षेत्राकडे वळले होते. १९२० पर्यंत जगात मोटारसायकलींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. विशेष करून पहिल्या जागतिक युद्धापर्यंत हे उत्पादन भारतात होते. हडसन यांनी ६७ देशांमधील विक्रेत्यांना आपल्या मोटारसायकली विकण्याचा विक्रम केला होता. १९३० च्या सुरुवातीला डीकेडब्ल्यू ही मोटारसायकल विकण्यामध्ये आघाडीवर असलेली कंपनी होती. दुसऱ्या महायुद्धानंतर बीएसए समूह जगामध्ये सर्वाधिक मोटारसायकल विकणारा समूह ठरला. १९५० मध्ये त्यांनी वर्षाला ७५ हजार मोटारसायकलींचे उत्पादन केले. १९५५ ते १९७० पर्यंतच्या काळात जर्मनीतील एनएसयू या कंपनीने मोटारसायकलींच्या अधिक उत्पादनाचा मान मिळविला होता. स्पर्धेतील मोटारसायकलींचे महत्त्व हेदेखील अनन्यसाधारण आहे. तरुणांच्या मनातील उन्मादाला, उत्साहाला गवसणी घालणाऱ्या मोटारसायकलींच्या शर्यतींनी जगभरात नेहमीच भुरळ घातलेली दिसते. आजही मोटारसायकलींच्या शर्यतींचे आकर्षण तसे तसूभरही कमी झालेले नाही. या मोटारसायकली इंधनाच्या वापरासाठी बचतीच्या नसल्या तरीही शर्यतींचे आकर्षण सर्वांना असते. किमान या क्षेत्रात शर्यतींसाठी लाखो लोक जीव ओतत असतात. अशा या शर्यतींमध्ये १९५० मध्ये सुसूत्रीकरण यायला लागले होते. शर्यतींसाठी मोटारसायकलींचा विकास अधिक ठामपणे केला जाऊ लागला. मोटारसायकलीचे विशिष्ट आरेखन, रचना यामध्ये शक्य तितके जबरदस्त बदल होण्यास सुरुवात झाली. त्या काळातील विचारांच्या पुढे जाऊन या मोटारसायकलींच्या आरेखनात बदल होऊ लागले. तशी निर्मिती केली जाऊ लागली. जर्मनीच्या एनएसयू या कंपनीने तसेच मोटो गुझ्झी यांनी या विकासामध्ये मोठा वाटा उचललेला दिसून येतो. ग्रॅण्ड प्रिक्स या मोटारसायकल शर्यतीचे महत्त्व खूप होते. या शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्या मोटारसायकली या स्ट्रिमलाइन मोटारसायकली होत्या. २५० सीसी इतक्या ताकदीची इंजिने त्यांना बसविण्यात आलेली होती. शर्यतींमध्ये अपघातांचे प्रमाणही होते. १९५४ ते १९५६ या काळात झालेल्या अपघातांमध्ये एनएसयू कंपनीच्या चार मोटारसायकलस्वारांना प्राण गमवावे लागले व त्यानंतर या कंपनीने अशा मोटारसायकलींच्या विकासकामाला स्थगिती दिली व या प्रकारच्या शर्यतींमधूनही सहभागी होणे थांबिवले. स्ट्रिमलाइन मोटारसायकलींनी या शर्यती १९५७ पर्यंत जिंकल्या होत्या ही बाब नमूद करावी लागते. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही बाबतीत मोटारसायकलींच्या शर्यतीवर बंदी घालण्याचे काम एफआयएम यांनी केले.
 
******************
एनफिल्ड-बुलेट
बुलेट ही मोटारसायकल तिच्या घक…धक अशा फायरिंगच्या आवाजामुळे, तिच्या दणकट व मजबूत बांधणी आणि

दिसण्यामुळे काहीशा राजेशाही थाटामुळे मोटारसायकलस्वारांच्याच नव्हे तर अन्य लोकांच्या मनातही एक स्वतंत्र स्थान पटकावून बसलेली आहे. खडतर व रफ-टफ रस्त्यावर सहजपणे नियंत्रित करता येईल अशी ही बुलेट सुरुवातीला १९३१
ते १९६६ या काळात रॉयल एनफिल्ड या उत्पादकाद्वारे तयार केली गेली. १९५५ पासून ती रॉयल एनफिल्ड मोटर्स यांनी उत्पादनात कायम ठेवली.
३४६ सीसी व ५०० सीसी सिंगल सिलिंडर असणारी कास्ट केलेल्या लोखंडी इंजिनाद्वारे सीन बर्न प्रक्रियेने इंजिन चालणारी ही बुलेट ४ गीयरची आहे.
१९३१ ते १९६४ या काळात ब्रिटन (यूके) येथील रॉयल एनफिल्ड कंपनीने तिचे उत्पादन केले. भारतात लोकांच्या कल्पनेला उंचावणारी अशी ही बुलेट १९५४ मध्ये भारत सरकारने पाकिस्तानच्या सीमेवर लष्करासाठी आणली. सुमारे ८०० बुलेट मोटारसायकली सुरुवातीला तेथे वापरण्यासाठी तैनात केल्या. आजही बुलेट म्हटली की डोळ्यासमोर उभी ठाकते ती १९५५ ची बुलेट!बुलेटच्या गुणविशेषांच्या जवळपास जाणारी एक मोटारसायकल भारतीय बाजारपेठेत उतरविण्यात आली होती. ती म्हणजे राजदूत. भारतीय बाजारपेठेत दुचाकीच्या इतिहासात सुरुवातीच्या काळात अशा दणकट मोटारसायकलींनी लोकांच्या मनात घर केले होते. आज राजदूतचे उत्पादन बंद झाले असले तरी बुलेट- रॉयल एनफिल्ड म्हणून एस्कॉर्टने तिची निर्मिती सुरू ठेवली आहे.
 
******************
१९६० पासून अगदी १९९० पर्यंत शर्यतींमध्ये टू स्ट्रोक मोटारसायकलींनी जगभरात लोकप्रियता मिळविली होती. १९५० मधील जर्मनीच्या वॉल्टर कॅड्डेन यांचा इंजिनासंबंधातील कामाचा वाटा यामागे काही प्रमाणात होता. आज जपानी कंपन्यांच्या मोटारसायकलींचा प्रभाव एकंदर जगभरात दिसतो. हडसन, बीएमडब्ल्यू या कंपन्या युरोपातील आहेत, त्यांचाही वाटा आज आहेच. पण जपानमधील होंडा, कावासाकी, सुझुकी, यामाहा या मोटारसायकल कंपन्यांच्या मोटारसायकलींचा प्रभाव जगात अधिक असल्याचे म्हणावे लागते. जशा अधिक ताकदीच्या शर्यतीच्या मोटारसायकली ज्या ३०० सीसी ताकदीच्यापेक्षा अधिक असतात, त्याचप्रमाणे त्यापेक्षा कमी ताकदीच्या मोटारसायकलींनी जगातील विशेष करून आशियातील तसेच आफ्रिकेतील बाजारपेठा काबीज केल्या आहेत. भारतीय कंपन्यांनीही या जगातील बाजारपेठेत आपले स्वत:चे वेगळे असे स्थान तयार केलेले आहे. हिरो मोटो कॉर्पची मोटारसायकलींसाठीची इंजिने आज सर्वाधिक खपाची म्हणूनही शाबीत झाली आहेत. बजाज, टीव्हीएस या भारतीय कंपन्यांनीही भारताव्यतिरिक्त अन्य देशांमध्ये मोटारसायकलींच्या बाजारपेठेत चांगले स्थान मिळविलेले आहे.
चीन, भारत, व्हिएतनाम व इंडोनेशिया या चार प्रमुख देशांमध्ये मोटारसायकलींचे प्रमाण अधिक असलेले दिसते. मोटारसायकल या वाहनाला इतके महत्त्वपूर्ण स्थान का आहे, याचे कारण या देशांमधील अर्थव्यवस्था व त्याचे परिणाम, इंधन कमी लागणे, सुकरता असणे, दळणवळणामध्ये व वापरामध्ये सुलभता व किफायतशीरपणा जाणवणे यामुळे मोटारसायकलींचे वा दुचाकींचे स्थान एकंदर वाहन उद्योगामध्ये मोठे आहे. त्यांचा तेथील एकूण बाजारपेठेतील वाटा अन्य वाहनांपेक्षा अधिक आहे. याशिवाय ब्राझील, सिंगापूर, ब्रिटन, तसेच युरोपातील शहरे येथेही मोटारसायकली वा स्कूटर्स यांना जीवनशैलीत महत्त्वाचे स्थान लाभले आहे. अमेरिकेतही दुचाकींना वाढती मागणी असल्याची आकडेवारी सांगते. इंधनाच्या विशेष करून पेट्रोलच्या वाढत्या किमतीचा हा परिणाम आहे हे नक्की.

– रवींद्र यशवंत बिवलकर

    वाहन उद्योग : वर्तमान आणि भविष्य  - भाग ४ 


मोटारसायकलीप्रमाणे स्कूटर या दुचाकी वाहनाच्या एका प्रकारालाही आज स्वतंत्र स्थान आहे. स्कूटर व मोटारसायकल यांचा समावेश स्वयंचलित दुचाकीमध्ये होत असला तरी त्यामध्ये दिसण्यात व असण्यात आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये बराच फरक आहे. तरीही स्कूटर म्हणजे एक मोटारसायकल आहे. पूर्वीच्या मोटारसायकलींचे रूप या स्कूटरमध्ये तिच्या आरेखनात दिसते. आज स्कूटर्स हे शहरी व ग्रामीण भागातील वाहतुकीचे एक सहज साधन आहे. केवळ पुरुषच नव्हे तर महिलांनाही स्कूटर चालविणे कठीण जात नाही, इतकी स्कूटर चालविण्याची क्रिया सोपी केली गेली आहे. त्यामुळेच आज स्कूटरला असणारी मागणी वाढल्यामुळे कंपन्यांनीही त्यांचे मूल्य गगनाला नेऊन भिडवले आहे.

दुचाकी- मोटारसायकल- स्कूटर


मोटारसायकलीप्रमाणे स्कूटर या दुचाकी वाहनाच्या एका प्रकारालाही आज स्वतंत्र स्थान आहे. स्कूटर व मोटारसायकल यांचा समावेश स्वयंचलित दुचाकीमध्ये होत असला तरी त्यामध्ये दिसण्यात व असण्यात आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये बराच फरक आहे. तरीही स्कूटर म्हणजे एक मोटारसायकल आहे. पूर्वीच्या मोटारसायकलींचे रूप या स्कूटरमध्ये तिच्या आरेखनात दिसते. आज स्कूटर्स हे शहरी व ग्रामीण भागातील वाहतुकीचे एक सहज साधन आहे. केवळ पुरुषच नव्हे तर महिलांनाही स्कूटर चालविणे कठीण जात नाही, इतकी स्कूटर चालविण्याची क्रिया सोपी केली गेली आहे. मोटारसायकलपेक्षा स्कूटर ही चालविण्यास व हाताळण्यास सोपी, कमी वजनाची, काहीशी आरामदायी, सुरक्षित, सामान नेण्यासही उपयुक्त असल्याचे दिसते. यामुळेच मोटारसायकलींच्या तुलनेत इंधन वापराच्या दृष्टीने स्कूटर तशी कमी किफायतशीर असूनही लोकांना परवडणारी ठरली आहे. मोटारसायकलीप्रमाणेच असली तरी तिला एक प्लॅटफॉर्म म्हणजे पायरीसदृश रचना असते, त्यावर स्कूटरचालक पाय ठेवू शकतो. स्कूटरची चाके, टायर हे आकाराने मोटारसायकलीच्या टायर व चाकांपेक्षा लहान आहेत. तिची ताकदही मोटारसायकलीच्या तुलनेत कमी ठेवलेली आहे. आज मोटो स्कूटर्स या प्रकारातच मात्र ताकदही मोटारसायकलींसारखी ठेवण्यात आली आहे. ५० सीसीपासून ते अगदी ८५० सीसी ताकदीच्या इंजिनांपर्यंत ही ताकद स्कूटर्सना प्रदान करण्यात आलेली आहे. वेग, पीक अप या बाबीही तसेच इंजिनाचे स्वरूपही मोटारसायकलीच्या समतलावर आणण्याचा प्रकार केला गेला आहे. पहिल्या जागतिक महायुद्धापूर्वी स्कूटर या वाहनाचा विकास होण्यास थोडी सुरुवात झाली. दोन जागतिक महायुद्धांनी जगावर मोठे परिणाम केले. त्या दोन महायुद्धांच्या दरम्यान, स्कूटरचा विकास कालानुक्रमे केला गेलेला दिसतो. किक स्कूटर (म्हणजे तीन वा दोन चाकांची, प्लॅटफॉर्म- फळी या चाकांना जोडून ठेवते व पुढील चाकाला नियंत्रणासाठी हॅण्डलबार दिलेला असतो, पायाने ढकलून ती पुढे सरकविली जाते) या प्रकाराच्या धर्तीवर मूलभूत स्कूटरची रचना केलेली दिसते. स्वयंचलित स्कूटरबाबत अमेरिकेच्या वाहतूक विभागाने ती मोटारसायकल म्हणून गणना करताना स्कूटरस्वाराचे पाय ठेवण्यासाठी त्यावर जागा असल्याचे नमूद केले आहे. स्कूटरची ही रचना लक्षात घेतली म्हणजे मोटारसायकलपेक्षाही ती वेगळी असल्याचे किमान आरेखनाबाबत तरी म्हणावे लागते. मोटारसायकलीचे गीयर पायाने नियंत्रित करतात क्लच डाव्या हाताने दाबून गीयर नियंत्रित करता येतात. स्कूटरलाही गीयरसहित असताना क्लच डाव्या हातात व गीयर त्याच नियंत्रण हॅण्डलबारवर डाव्या हातात क्लच दाबून नियंत्रित करता येतात. उजव्या बाजूला हॅण्डलबारवर पुढील ब्रेकचे नियंत्रण एका कळीद्वारे दिलेले असते. कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन किवा मॅन्युअल ट्रान्समिशन पद्धतीत आज स्कूटर अस्तित्वात असल्याचे दिसते. स्कूटरला बॉडीवर्क केलेले आहे. तसेच बाजूने पत्रा (सध्या फायबरचा वापरही होतो) वापरून बाजू झाकली जाते. पारंपरिक अशा मोटारसायकलीपेक्षा स्कूटर ही काहीशी लहान आहे. प्रेस्ड स्टील किंवा ऍल्युमिनियम, लोखंड यांची कास्ट केलेली शरीररचना या स्कूटरला असून सामान ठेवण्यासाठीही कप्पे दिले जातात. आज जुन्या प्रकारच्या स्कूटरमध्ये अन्य काही बदलही केले गेलेले आहेत.

मोटारसायकलीच्या इतिहासातील स्कूटर हा एक टप्पा म्हणावा लागेल. १९०२ मध्ये ऑटो फॉच्युएल मोटारसायकल तयार केली गेली. यामध्ये चालविणाऱ्यासाठी नेहमीच्या आसनापेक्षा वेगळे आसन दिले गेले. त्रिकोणी पद्धतीच्या आसनाऐवजी एक छोटेखानी खुर्चीच तेथे बसविली गेली. हा प्रकार मोटारसायकलीच्या रचनेमध्ये काहीसा तडा देणारा होता. १९२२ पर्यंत या प्रकारच्या मोटारसायकलीचे उत्पादन केले गेले. साधारण १९०० मध्ये मोटारसायकलीचे आरेखन विकसित केले गेले. १८९४ मध्ये हिल्डब्रॅण्ड व वुल्फम्युल्लर यांनी पहिली मोटारसायकल बनविली. फ्रेमद्वारे तयार केलेली रचना असणारी तिची इंधनटाकी ही खालच्या अंगाला होती. टू सिलिंडरचे इंजिन त्याला बसविण्यात आले होते. सिलिंडर फ्रेमला रांगेत बसविले होते. पाण्याद्वारे इंजिन थंड करण्याचे तंत्र त्यामध्ये होते. त्या मोटारसायकलीच्या


मागच्या बाजूला फेंडरवर रेडिएटर बसविण्यात आलेला होता. मोठ्या प्रमाणावर त्याचे उत्पादन केले जाऊन त्याची विक्री केली गेली. पायाऐवजी इंजिनाद्वारे चालविण्यात येणारी तची सायकल असल्याने साहजिकच ती पहिली मोटारसायकल ठरली. कमाल वेग होता ताशी ४० किलोमीटर. १९१५ ते १९३० हा स्कूटर्सच्या पहिल्या पिढीचा काळ म्हणता येतो. मोटोपेड या कंपनीने १९१५ मध्ये स्कूटर उत्पादन केले त्या स्कूटरला मोटो स्कूटर्स असे म्हटले जाते. त्यानंतर ऑटोपेड ही मोटो स्कूटर आणली गेली. त्यात हॅण्डलबारचा स्तंभ इंजिनाद्वारे पुढे ढकलला जात असे व ब्रेक हा त्या कॉलमला मागे खेचण्यात व्यस्त असे. खेळण्यातील सध्या दिसणाऱ्या स्कूटरप्रमाणे असणाऱ्या त्यातील फळीवर उभे राहून पायाने गती देण्याच्या प्रकारातील ही ऑटोपेड स्कूटर म्हणता येईल. न्यूयॉर्कच्या लॉंग आयलंड या ठिकाणी १९१५ ते १९२१ या काळात त्याचे उत्पादन झाले. पहिल्या जागतिक युद्धानंतर स्कूटर्सच्या उत्पादकांची व आरेखनकारांची संख्या वाढली. स्कूट्टामोटा, नीलवर्थ, रेनॉल्ड्‌स रूनाबोट या मोटरस्कूटर्स १९१९ मध्ये तयार करण्यात आल्या. त्यानंतर १९२० मध्ये युनिबस आणली ती ग्लुकस्सेंटरशायर एअरक्राफ्ट कंपनीने. यामध्ये स्कूट्टोमोटा आर्थिक दृष्टीने किफायतशीर मानली गेली, व्यावहारिक व लोकपिरयही झाली. नीलवर्थ ही इलेक्ट्रिक लाइटसाठी तर रेनॉल्ड्‌स रूनाबोट ही फ्रंट सस्पेंशन, दोन गती देणारे गीयर्स आणि लेगशील्ड्‌स, आसनासाठी स्प्रिंग् व कॉइल स्प्रिंग्ज अशी व्यवस्था असणारी होती. युनिबस ही दोन गीयर्स असणारी व पूर्ण बॉडी असलेली असल्याने ती स्कूटर्सच्या दुसऱ्या व तिसऱ्या पिढीतील स्कूटर्सचीच नांदी म्हटली पाहिजे. सुरुवातीचा हा काळ असल्याने स्कूटर्सच्या आजच्या तुलनेत त्या खूपच प्राथमिक स्तरावरील वाटतील. पण तरीही त्यासाठी केला गेलेला विचार व रचना शोधण्याचे सामर्थ्य यांची वाखाणणी करायला हवी.

स्कूटर विकास जागतिक युद्धांशी संबंधित


स्कूटर बनावटीचा विकास हा जागतिक युद्धांशी निगडित आहे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. खास करून पहिल्या महायुद्धामध्ये लढाऊ विमाने तयार करणाऱ्या निर्मात्यांनी युद्धानंतरच्या काळात त्या कामातून अंग काढून घेतले. काही ना काही उत्पादन करायचे व यासाठी आणखी दुसरी काही उत्पादने तयार करावयाची या भूमिकेतून शोध सुरू झाले. यात व्यक्तीही होत्या, कंपन्याही होत्या. नाकाजिमा एअरक्राफ्ट कंपनीचा एक भाग असलेली फ्युजी सँगयो या कंपनीने आपले पहिले स्कूटर उत्पादन सुरू केले. १९४६ च्या जूनमघ्ये फ्युजी रॅबिट एस १ ही स्कूटर त्यांनी तयार केली. अमेरिकी लष्कराने वापर केलेल्या पॉवेल स्कूटर्सची प्रेरणा यामागे होती. लष्करी वापरातील अतिरिक्त भाग, सुटे भाग यांच्या साहाय्याने ही एस १ स्कूटर तयार करण्यात आली होती. नाकाजिमा बॉम्बर या लढाऊ विमानाच्या शेपटीकडील चाकाचा वापरही केला गेला. यामध्ये एस १ च्या पुढील चाकासाठी त्याचा वापर करण्याचे ठरविले गेले. त्यानंतर वर्षभरातच मित्सुबिशी कंपनीने सी१० ही सिल्व्हर पिगीऑन या स्कूटर मालिकेतील पहिली स्कूटर निर्माण केली. सॅल्सबरी मोटार ग्लाइडवरून यासाठी प्रेरणा घेण्यात आली होती. अमेरिकेत राहिलेल्या एका जपानी माणसाने आणलेल्या या ग्लाइडवरून प्रेरणा मिळाली. १९६० पर्यंत या दोन्ही स्कूटरची निर्मिती केली गेली. स्कूटरबाबत संशोधने, प्रेरक बाबी चालू होत्याच. त्या अनुषंगाने एस-६०१ या रॅबिट सुपरफ्लोमध्ये टर्क कन्व्हर्टरसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसारख्या नव्या, आधुनिक तंत्राचाही समावेश करण्यात आला होता. याशिवाय त्यात न्यूमॅटिक सस्पेंशन, इलेक्ट्रिक स्टार्टर या तांत्रिकतेचाही समावेश करण्यात आला होता. सी-१४० या सिल्व्हर पिगीऑन या स्कूटरच्या उत्पादनानंतर मित्सुबिशीने स्कूटरचे उत्पादन बंद केले. तर फ्युजीच्या स्कूटर्सचे उत्पादन सुरूच होते. एस-२११ मालिकेतील स्कूटरचे उत्पादन १९६८ च्या जूनमध्ये केले गेले. १९३६ ते १९६८ या दरम्यानच्या काळातील स्कूटर उत्पादनातील ही स्कूटरची दुसरी पिढीच म्हणावी लागेल. ई. फोस्टर साल्सबरी व ऑस्टिन एल्मोर यांनी साल्सबरी मोटर ग्लाईड ही स्कूटर विकसित केली. ड्रायव्हरट्रेनच्या वर आसन असणारी ही स्कूटर कॅलिफोर्नियात १९३६ मध्ये उत्पादन करण्यात येत होती. १९३८ मध्ये साल्सबरी यांनी व्हेरिएबल ट्रान्समीशन (सीव्हीटी) हे तंत्रज्ञान प्रथम आणले. आज हे तंत्र अनेक ठिकाणी वापरले जाते, त्यात सुधारणा करूनही ते आज काही अधिक स्वरूपात विकसित स्थितीत आहे. या यशस्वी कामामुळे साल्सबरीने या तंत्राला परवाना अन्य उत्पादकांनाही दिला. यात पिआगीओ कंपनीचाही समावेश आहे. एक मानांकनच या साल्सबरीने त्या वेळी निर्माण केले. बॉवेल, मोटो-स्कूट, कुशमॅन, रॉक-ओला व अन्य मोटर स्कूटर बनवणाऱ्या उत्पादकांनी या मानांकनातूनच प्रेरणा घेतलेली आहे.

कुशमॅन कंपनीने १९३६ ते १९६५ या काळात मोटर स्कूटर तयार केल्या. कुशमॅन हा इंजिन बनविणारा होता. कुशमॅन व साल्सबरी यांच्यात स्कूटर निर्माते म्हणून नंतर स्पर्धा सुरू झाली. कुशमॅन यांनी इंजिन पुरवठ्याबाबत केलेली विचारणा साल्सबरीला अमान्य झाल्याने साल्सबरी व कुशमॅन या दोन्ही कंपन्या परस्परांसमोर ठाकल्या त्या स्कूटर निर्मात्या म्हणून. कुशमॅनने १९४० मध्ये सेंट्रिफ्युगल क्लच आपल्या स्कूटरना बसविण्यास सुरुवात केली. कुशमॅनचे ऑटो ग्लाइड मॉडेल ५३ हे लष्कराच्या हवाई दलाच्या शाखेने पॅराशूटद्वारे उतरिवले. त्याला कुशमॅन एअरबॉर्न असे नाव ठेवण्यात आले. कुशमॅनच्या स्कूटर्स या संदेशवहनाच्या कामासाठी लष्कराने आपल्या तळांमधील कामांसाठी वापरल्या. साल्सबरीच्या स्कूटर्स १९४८ पर्यंत तयार करण्यात येत होत्या, तर कुशमॅनच्या स्कूटर्सचे उत्पादन १९६५ पर्यंत झाले.

हडसनच्या १६० सीसी क्षमतेच्या इंजिन असणाऱ्या स्कूटर्स १९६० ते १९६५ या कालावधीमध्ये तयार करण्यात येत होत्या. याच धर्तीवरील इंजिन डीके डब्ल्यू आरटी १२५ या मोटारसायकलीच्या मॉडेलमध्ये लावण्यात आले होते. या मोटारसायकलीला फायबरबॉडी बसविण्यात आली होती. तसेच सीव्हीटी ट्रान्समिशन असणारी ही मोटारसायकल पुलकॉर्ड स्टार्टींग या तंत्राची होती.

तिसऱ्या पिढीतील स्कूटर्समध्ये संस्करण झालेल्या स्कूटर्स म्हणजे दुसऱ्या पिढीतील व त्यानंतरचा काळ. १९४६ ते १९६४ व नंतरचा हा तिसऱ्या पिढीचा काळ. इटलीमधील व्हेस्पा व लॅम्ब्रेटा या जगप्रसिद्ध ब्रॅण्डच्या स्कूटर्स. दुसऱ्या जागतिक युद्धानंतर स्कूटर्ससाठी इटलीमधील पिआगिओ व्हेस्पा ही कंपनी म्हणजे एक मानांकनच बनून गेली. आजही व्हेस्पा हा ब्रँण्ड स्कूटर्ससाठी अभिमानाने व विश्‍वासाने घेतला जातो. एप्रिल १९४६ मध्ये कंपनीने पेटंट घेतले ते विशेष करून विमाने आरेखित करण्यासाठी व त्यातील भागांच्या निर्मितीसाठी. डी ऍस्कानियो ही ९८ सीसी ताकदीच्या इंजिनाची स्कूटर लक्षणीय अशा बदलांसाठी प्रसिद्ध आहे. त्या स्कूटरची कमनीयता (स्लीक), ताण सहन करण्याची ताकद असणारी रचना, गीअर बदलण्यासाठी असणारी कळ ही नियंत्रणाच्या हॅण्डलबारमध्ये देणे, इंजिन मागील चाकाजवळ बसविणे व बेल्टड्राइव्ह ही संकल्पना स्कूटरच्या आतापर्यंतच्या प्रवासात होती ती बाजूला सारणे, पारंपरिक फोर्कची असणारी पद्धत बदलून विमानाप्रमाणे टायर बदलण्यास सोयीस्कर अशी आर्मची रचना तेथे करणारा अशा अनेक विकासांनी ही स्कूटर बाजारपेठेत उतरविण्यात आली. स्कूटरस्वाराला वाऱ्याचा त्रास होऊ नये, धुळीपासून संरक्षण व्हावे तसेच मोटारसायकलीसारखा आवाज कमी व्हावा अशी दक्षता या स्कूटरच्या रचनेमध्ये करण्यात आली. ही स्कूटर म्हणजे मोटारसायकल, चारचाकी आणि विमान अशा वाहनांच्या रचनेतील एक संगम होता. यामुळेच व्हेस्पा ही लोकांच्या मनात एक मानाचे स्थान बनली गेली. पिआगीओच्या अध्यक्षांनी या स्कूटरच्या मूळ संकल्पित बांधणीची पाहणी केली तेव्हा त्यांनी ‘सेम्ब्रा उना व्हेस्पा’ म्हणजे ‘इट लूक लाइक ए व्हास्प’ असे म्हटले. वास्प म्हणजे एक प्रकारची गांधीलमाशी. ( कमनीय वा बारीक कंबरेच्या वर्णनासाठी वास्प वेस्टेड असे म्हणतात. म्हणजे सिंहकटी असणारी ही व्हेस्पा असा त्याचा अर्थ होतो. ) व्हेस्पाची ही कमनीयता वा बारीक कंबरेप्रमाणे असणाऱ्या स्त्रीशी तुलना व्हेस्पाच्या सौंदर्याचे वर्णनच होते.

१९४७ मध्ये इन्नोसेन्टी या कंपनीने लॅम्ब्रेटा या स्कूटरची निर्मिती केली. व्हेस्पाशी स्पर्धा करणारी लॅम्ब्रेटा ही कंपनीचे महासंचालक गिसिप लॉरो व अभियंते पिरेलुईगी टोरे यांनी आरेखित केलेली रचना होती. या स्कूटरची फॅक्टरी जेथे होती, त्या शेजारी असलेल्या लॅम्ब्रेट या भागावरून या स्कूटरीचे नामकरण लॅम्ब्रेटा असे करण्यात आले. १९४७ मध्ये झालेल्या पॅरिस मोटार शोमध्ये ही ठेवण्यात आली. २३ डिसेंबर १९४७ रोजी लॅम्ब्रेटा ए ही बाजारात आली. वर्षभरात नऊ हजार लॅम्ब्रेटा स्कूटर्सची विक्री झाली. ताशी ७२ किलोमीटर इतका कमाल वेग असणारी १२३ सीसी ताकदीच्या इंजिनाची ही स्कूटर अशा वेळी बाजारपेठेत आली की ज्या वेळी पेट्रोल हे रेशनिंगवरच जवळजवळ विकले जात होते. इतकी टंचाई त्या काळात होती. पहिल्या लॅम्ब्रेटाच्या आरेखनाचा विचार करता ती शाफ्ट ड्राइव्ह असलेली व मागील सस्पेंशन नसणारी स्कूटर होती. त्यानंतरच्या आरेखनामध्ये अनेक ड्राइव्ह त्यात देण्यात आले, सस्पेंशन पद्धत त्यात देण्यात आली. या बाबी स्विंगआर्म माऊंटेड इंजिन व साखळीद्वारा (चेनड्राइव्ह) गती देण्याची स्थिती आरेखनात देऊ करीपर्यंत तशाच होत्या.

 जर्मनीमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर विमानोद्योग जवळजवळ बंदच झाला होता. त्या संलग्न कंपन्यांच्या दृष्टीने अन्य व्यवसाय शोधणे वा अन्य उत्पादनात लक्ष देणे अपरिहार्य होते. काहींनी मोपेड व सायकल उत्पादन सुरू केले तर काही कंपन्यांनी शिवण यंत्रे, वाहनांचे सुटे भाग अशी उत्पादने सुरू केली. १९५४ मध्ये हॉफीमॅनकडून मेस्सर्शमित कंपनीने व्हेस्पा स्कूटरकडे जर्मन परवाना घेतला. १९५४ ते १९६४ अशी दहा वर्षे व्हेस्पा स्कूटरचे उत्पादन त्यांनी केले. हेन्केल कंपनीने स्वत: स्कूटरचे आरेखन व उत्पादन सुरू केले. हेन्केल टुरिस्ट ही स्कूटर त्यांनी १९६० मध्ये तयार केली. अन्य स्कूटर्सच्या तुलनेत ही काहीशी जड व कणखर अशी स्कूटर होती. हवामानापासून चांगले संरक्षण या स्कूटरला देऊ करण्यात आले होते. १७५ सीसी व ४ स्ट्रोक इंजिन असणारी ही स्कूटर ११० किलोमीटर इतक्या कमाल ताशी वेगाने धावू शकत होती. शेतीसाठीची सामग्री व यंत्रणा तयार करणाऱ्या ग्लास या कंपनीने १९५१ ते १९५५ या दरम्यान गोग्गो स्कूटर तयार केली. त्यानंतर त्यांनी या स्कूटरचे उत्पादन बंद केले व गोग्गोमोबिल मायक्रोकारच्या उत्पादनावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. जर्मनीमध्ये अनेक उत्पादकांनी स्कूटरनिर्मिती व्यवसायात उडी घेतली होती. एनएसयू या कंपनीने १९५० ते १९५५ या काळात लॅम्ब्रेटाचेही उत्पादन केले. त्यानंतर त्यांनी स्वत:ची प्रायमा ही स्कूटर तयार केली. १९६० मध्ये झुंड्डापने बेल्ला या नावाची स्कूटर तयार केली. सुमारे दहा वर्षे या बेल्लाचे उत्पादन केले गेले. १५० सीसी, १७५ सीसी व २०० सीसी अशा तीन प्रकारच्या इंजिनांमध्ये या बेल्लाचे मॉडेल तयार करण्यात येत होते. कमाल वेग ताशी ९० किमी इतका होता. अतिशय चांगल्या दर्जाची, टिकाऊ असणारी ही स्कूटर लोकप्रिय झाली, आजही काही जणांकडे ती अस्तित्वात आहे. १९५० मध्ये मैको या कंपनीने मैकोलेट्टा ही स्कूटर तयार केली. त्या स्कूटरीसाठी ग्राहकाला इंजिन कोणत्या ताकदीचे हवे, याचा पर्याय ठेवण्यात आला होता. कमाल ११० किलोमीटर ताशी वेग मैकोलेट्टाला होता. तसेच १७५ सीसी, २५० सीसी व २७५ सीसी ताकदीच्या तीन प्रकारच्या इंजिनांचा पर्याय होता. त्या वेळच्या २५० सीसी मोटारसायकलीला पर्याय म्हणूनही या स्कूटरकडे पाहिले जात होते, कारण मोटारसायकलीसारखी ट्युब्युलर फ्रेम या स्कूटरला देण्यात आली होती. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी टेलीस्कोपिक सस्पेंशन, १४ इंची चाके असे गुणविशेष या स्कूटरला होते.

डीकेडब्ल्यूची हॉबी, ड्युरोकोप्प डायना, टीडब्ल्यूएनची कॉन्टेसा अशीही अन्य जर्मन कंपन्यांच्या स्कूटरची निर्मिती त्यावेळी केली गेली.

बिरक्टनमध्ये डग्लसने व्हेस्पाचे उत्पादन १९५१ ते १९६१ या काळात केले. तर १९६१ ते १९६५ या काळात जुळणीचे काम केले. बीएसए व ट्रिंफ यांनीही अनेक स्कूटर्सचे उत्पादन केले. यात बीएसए डँन्डी ७०, ट्रिंफची टिना, टायग्रेस अशा स्कूटर्स होत्या. १९५९ ते १९६४ या काळात टायग्रेस या १७५ सीसी २ स्ट्रोक इंजिनच्या व २५० सीसी ४ स्ट्रोक इंजिनाच्या स्कूटरची निर्मिती केली गेली. पायाने नियंत्रित करण्याचे चार गीयर्सही या स्कूटरला देण्यात आले होते. बीएसएचे सनबीम हे टायग्रेसचेच एक समांतर रूप होते.

भारतीय बाजारपेठेतील स्कूटर

भारतात मोटारसायकल व स्कूटर्स यांचा वापर आज मोठ्या प्रमाणात असून बजाज स्कूटर्सने १९७२ पासून २००९ पर्यंत स्कूटर्सचे उत्पादन केले. चेतक हा त्यांच्या स्कूटर्स उत्पादनातील मानबिंदूच होता. निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाणारी ही स्कूटर काही वर्षे तर परकीय चलन भरल्यानंतर मिळत असे. स्कूटरसाठी नोंदणी व रांग असे. इतकेच नव्हे तर नवरदेवाची मागणीही या स्कूटरसाठी असे. मग बिचारा वधुपिता ती मागणी कशीबशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असे. चेतक ही १४९ सीसी व टू स्ट्रोक इंजिन असलेली स्कूटर नंतर ४ स्ट्रोक इंजिन बसवून उत्पादन केले केले. तत्पूर्वी त्याच्या काही आवृत्त्याही निघाल्या. चेतकबरोबर लीजंड, सुपर, प्रिया (महाराष्ट्र स्कूटर्सबरोबर संयुक्त ), कब एम ५०, एम ८० व एम ८० ४ स्ट्रोक अशा स्कूटर्सही लोकप्रिय झाल्या. याशिवाय बजाजच्या छोटेखानी ५० ते ८० सीसी ताकदीच्या इंजिन असणाऱ्या स्कूटीही भारतीय बाजारपेठेत आणल्या गेल्या. चेतक व लीजंड या व्हेस्पाच्या स्प्रिंट या मॉडेलवर आधारित स्कूटर होत्या. २००९ मध्ये बजाजने स्कूटर्सचे उत्पादन बंद केले .

भारतात सुरुवातीच्या काळात स्कूटर प्रकारामध्ये व्हेस्पाची कामगिरीही आहे. एलएमएल मोटर्सबरोबर व्हेस्पाने संयुक्तपणे उत्पादन सुरू केले. पिआगीओशी संयुक्त करारानुसार भारतात पी मालिकेतील स्कूटर्सचे हे उत्पादन होते. त्यानंतर १९९९ मध्ये पिआगीओबरोबर झालेल्या वादामुळे एलएमएलने उत्पादन थांबविले. अमेरिकेत या मालिकेतील उत्पादन स्टेला या नावाने व अन्य देशांमध्येही दुसऱ्या नावे या स्कूटरचे उत्पादन चालू आहे.

मोटोस्कूटरच्या मालिकेतील लॅम्ब्रेटा स्कूटर भारतात येण्यापूर्वी इटलीतील मिलान येथे उत्पादित केली जात होती. इन्नोसेन्टी ही कंपनी टालीत त्याचे उत्पादन करीत होती. आज ब्रॅण्ड फियाटकडे आहे. भारतात स्कूटर इंडिया लि.ने लॅम्ब्रेटा तयार करणे सुरू केले. ऑटोमोबाइल प्रॉडक्ट ऑफ इंडिया (एपीआय) या कंपनीने इन्नोसेन्टी कंपनीच्या लॅम्ब्रेटा स्कूटर्स भारतात जुळणी करण्यास सुरुवात केली. १९५० च्या सुमारास ४८ सीसी इंजिन असलेल्या ली मालिकेतील एलडी मॉडेलचे भारतात अशा पद्धतीने आगमन झाले. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता, त्या वेळी मोटारींचे उत्पादन येथे नव्हते. भारतात दळणवळणाच्या साधननिर्मितीसाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. १९७६ पर्यंत लॅम्ब्रेटा या नावाने ही स्कूटर विकली गेली. या स्कूटरची टीव्ही १७५ ही स्कूटर मॅक १७५ या नावानेही येथे तयार करण्यात आली. १९७२ मध्ये स्कूटर इंडिया लि. या सरकारी कंपनीने इन्नोसेन्टीचे संपूर्ण कामकाज आपल्या ताब्यात घेतले व त्यानंतर तीनचाकी एपीआय १७५ या रिक्षाचीही निर्मिती केली गेली. उत्तर प्रदेशात लखनौ येथे ही कंपनी होती. मूळ कंपनीच्या कर्मचार्‍यांचा वापर भारतात फॅक्टरी उभारणीच्या कामात करण्यात आला. विजय डिलक्स व डीएल या लॅम्ब्रेटा जीपी १५० मॉडेलवर आधारित तयार करण्यात आलेली स्कूटर भारताने निर्यातीसाठी तयार केली. ऑलविन पुष्पक, फॉल्कन व केसरी या नावानेही विजय सुपरचे उत्पादन करून विकले गेले.  १९८०-८१ या वर्षात चांगला खप लॅम्ब्रेटा स्कूटरने प्रस्थापित केला. ३५ हजार युनिटची विक्री या वर्षात झाली मात्र १९८७ मध्ये खप घसरला. १९९७ मध्ये उत्पादन बंद करण्यात आले. त्यानंतर २०११ मध्ये स्कूटर इंडिया लि.चे उत्पादन आता लॅम्ब्रेटा इंजिनवर आधारित विक्रम या तीनचाकी रिक्षेत करण्यात आले. लॅम्बी, लॅम्ब्रेटा, विजय सुपर, विक्रम अशा नावांच्या उत्पादनातून कंपनीची वाटचाल चालली होती.

स्कूटर्सच्या तांत्रिक विकासाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून संशोधने होत आहेत, त्या दृष्टीने बदलही होत आहेत. यामध्ये ऍल्युमिनियम चौकटीचा बॉडीसाठी वापर, क्रॉस लिंकड् ब्रेक, डिस्क ब्रेक्स, अंतर्गत समतोल राखणारे इंजिन, ऑटो स्टार्ट, घड्याळ, विंडशील्ड, फोर स्ट्रोक इंजिन, फ्युएल इंजेक्शन अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. चढत्या दरांमुळे इंधन वापर हीदेखील आजची एक समस्याच होऊन बसली आहे. यामुळे इंधन बचत करणारे किफायतशीर तंत्रज्ञान व इंजिन इतकेच नव्हे तर विजेच्या साहाय्याने बॅटरी चार्ज करून त्यातून होणाऱ्या ऊर्जानिर्मितीवर चालणारी स्कूटर, सौरऊर्जेवर चार्ज होणारी बॅटरी व त्याद्वारे वाहन चालविणे, अशा प्रकारच्या अनेक प्रयत्नांमधून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न वाहन उद्योगात होत आहे.

तीनचाकी स्कूटर 


दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कुशमॅन कंपनीने मॉडेल ३९ तयार केले, जे तीनचाकी स्कूटरचे होते. त्यामध्ये पुढील चाकांमध्ये सामान ठेवण्यास जागा केली होती. अमेरिकेच्या लष्करासाठी अशा ६०६ स्कूटर्स विकण्यात आल्या. याच धर्तीवर पिआगीओ एमपी ३ ही पुढे दोन चाके असणारी स्कूटर आहे. या स्कूटरला वाकणारी सस्पेंशन देण्यात आली असून त्यामुळे वळण घेताना स्कूटर व स्कूटरस्वाराला फार त्रास वाटत नाही. बहुतांशी मोटारसायकलींना तीनचाकी करताना ज्या त्रुटी आढळल्या त्या यात दूर करण्यात आल्या आहेत. मोटारसायकलीप्रमाणे या स्कूटरची चाके फार मोठी नाहीत. तसेच हे वाहन स्कूटर या वाहनाच्या पायाभूत व्याख्येत बसणारे असल्याने तीनचाकी स्कूटर म्हणूच पिआगीओ एमपी ३ कडे पाहावे लागेल.


*******

मॅक्सी स्कूटर


लांबवरच्या प्रवासाला जाण्यासाठी असलेली ही मॅक्सी स्कूटर आहे. तिला टुरिंग स्कूटर असेही म्हटले जाते. २५० सीसी ते ८५० सीसी इतक्या ताकदीच्या दरम्यान असणारी इंजिन क्षमता या प्रकारातील स्कूटरना देण्यात येते. १९८६ मध्ये होंडा कंपनीने सीएन २५० हेलिक्स (स्पायझो, फ्युजन) ही बाजारपेठेत आणली व त्यानंतर सुझुकीने बर्गमॅन ४०० व बर्गमॅन ६५० ही मॅक्सी स्कूटरची रूपे तयार केली. अन्य कंपन्यांनीही अशा प्रकारच्या मॅक्सी स्कूटर्सची निर्मिती केली. या स्कूटरचे इंजिन फ्रेमला संलग्न केलेले असते. यामुळे मोठी चाके असणारी व मोटारसायकलीचेही काहीसे रूप घेणारी ही मॅक्सी स्कूटर नियंत्रण व वजन सहन करण्यासाठी उपयुक्त असते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधाही काही मॅक्सी स्कूटर्सना देण्यात आलेली आहे.

*******

इलेक्ट्रिक स्कूटर

इलेक्ट्रिक म्हणजे विजेवर चालणाऱ्या स्कूटरची ऊर्जा वा ताकद असते ती म्हणजे त्यात वापरण्या


त येणारी बॅटरी. ही चार्ज करता येणारी बॅटरी असते. विजेवर ती चार्ज करून त्याद्वारे मिळणारी ताकद स्कूटरच्या मोटरीला देण्यात येते. त्याद्वारे स्कूटर चालते. फ्युएल सेल तंत्रही यामध्ये विकसित करण्यात आले आहे. पेट्रोल व वीज अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जेवर चालणारी हायब्रीड तंत्रानेही स्कूटर विकसित करण्यात आली आहे. मात्र भारतात या प्रकारच्या मोटारसायकली वा स्कूटर्स यांचा फार प्रभाव अद्याप तरी पडलेला नाही. तशी त्यांची फार विक्री झालेली दिसून येत नाही. भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त ठरणार आहे हे मात्र नक्की.

*******

अंडरबोन काहीशी मोटारसायकलीसारखी दिसणारी पण स्कूटर या सदरात मोडणारी ही अंडरबोन आरेखनाची रचना म्हणजे बजाजच्या एम ५०, एम ८० किंवा होंडा स्ट्रीट ही रोटेट गीयरची तंत्र असणारी स्कूटर. एका लोखंडी पाइपाच्या साहाय्याने या मोटारसायकलीच्या शरीराची रचना असते. स्कूटरमध्ये इंजिन मागील चाकालगत असते पण यामध्ये हे पुढील चाकामागे व मागील चाकापासून पुढे असे मध्यभागी बसविलेले असते. स्कूटरस्वाराचे पाय यात मोकळे असतात, तेथे त्याच्या गुडघ्यांना मोकळेपणा मिळतो. स्कूटरसारखी ही रचना असते. स्कूटरसारखा प्लॅटफॉर्म जो पाय ठेवण्यासाठी असतो तो या अंडरबोनच्या रचनेत नसतो.


– रवींद्र यशवंत बिवलकर


    वाहन उद्योग : वर्तमान आणि भविष्य  - भाग ५ 

भारतातील तळागाळापर्यंत पोहोचलेल्या दुचाकी

मोटारसायकलींच्या आणि स्कूटर्सच्या बाबतीत भारतीय ग्राहक खूप चोखंदळ म्हणावा लागेल. नुसताच चोखंदळ नाही, तर आतापर्यंतच्या अनेक दुचाकींच्या विकासानुसार त्या दुचाकी स्वीकारून दुचाकी उद्योगाला भारतीय ग्राहकांनी खूप मोठे केले आहे असेच म्हणावे लागते. दुचाकींमधील स्कूटर्स, मोटारसायकली आणि मोपेड, स्कुटीसारखी वाहने अगदी गीयर्सपासून गीयरलेसपर्यंतच्या स्कूटर्स, बॅटरी-विजेवर चालणाऱ्या दुचाकींनी भारतीय ग्राहकाला अनेक पर्याय दिले. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वसामान्यांचे खासगी वाहन म्हणून या दुचाकींनी मोठी कामगिरी बजावलेली आहे. त्यांचा वाढता खप व वाढती लोकप्रियता ही दुचाकींच्या मोठ्या उपयुक्ततेचीच ग्वाही असल्याचे म्हणता येईल.



भारतीय ग्राहक तसा चोखंदळ आहे. तो शहरातील असो की ग्रामीण भागातील, त्याचे रस्ते खडकाळ असोत किंवा डांबरी वा कॉंक्रीटचे असोत, इतकेच कशाला पायवाट असो किंवा नसो तेथेही या दुचाकींचा वापर केला जातो. इतकी त्यांची गरज आज भारतातील अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये, पाड्यांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळेच त्यांचा वापरही वैविध्यपूर्ण असल्याचे दिसते. एकेकाळी दुधाचा व्यवसाय करणार्‍यांना दुचाकी, मग ती एनफिल्ड, जावा, यझ्दी, असो की एम ५० वा एम ८० सारखी छोटेखानी स्कूटर असो, त्या दुचाकीचा वापर त्यांच्याकडून अगदी अधिकाधिक केला गेला आजही तो तसा होत आहे. तसाच वापर करून अन्य छोट्या व्यावसायिकांनीही दुचाकीमुळे आपला व्यवसाय अधिक विकसित केला. शहरांमध्ये एकेकाळी या मोटारसायकलींचा वापर हा तसा कमी प्रमाणात होत होता. स्कूटर्सचा वापर अधिक होत होता. त्यानंतर मात्र मोटारसायकलींना मागणी वाढत गेली. एके काळी लॅम्ब्रेटा, व्हेस्पा व बजाजच्या सुपर, चेतक या स्कूटर्सनी जनमानसात एक वेगळे स्थान पटकाविले होते. या स्कूटर्सनी ग्रामीण व शहरी भागात ग्राहकांच्या विविध प्रकारच्या सेवा बजाविल्या. चालकासाठी असणारी स्प्रिंगची त्रिकोणी आकाराची आसनव्यवस्था ही सस्पेंशनसारखी काम करणारी होती, ही बाब आज पटू लागली आहे. पण त्या काळात स्कूटर्सना असणारे सस्पेंशन, खराब रस्ते यामुळे या स्कूटर्समुळे पाठीचे दुखणे ओढवते, असा एक समजही तयार झाला होता. हे सारे समज- गैरसमज कालांतराने वाढले व कमी झाले. त्या स्कूटर्समधील दोष व गुण आता नवीन पिढीला समजण्यापलीकडचे आहेत, कारण त्या स्कूटर्स आता उत्पादनात नाहीत. नव्या प्रकारच्या गीयरलेस स्कूटर्सचा जमाना असल्याने व त्यांच्या वेगात सुधारणा झाली असल्याने त्या फोर स्ट्रोक पद्धतीच्या व पर्यावरणलक्ष्यी असल्याचा दावा होऊ लागल्याने एक प्रकारे जुन्या स्कूटर्सचे महत्त्व कमी झाले आहे. सर्वांना चालवायला सोपी असणारी स्कूटर तयार झाली व गीयरच्या स्कूटर्स मागे पडल्या ही मात्र आजची वस्तुस्थिती आहे.

मोपेडनेही भारतातील ग्रामीण व शहरी भागात जम बसविला होता. टीव्हीएस, कायनेटिक, हिरो, बजाज आदी कंपन्यांच्या मोपेड्‌स स्कूटी यामुळे महिला वर्गालाही सायकलसारख्या स्वचलित दुचाकीवरून स्वयंचलित दुचाकीवर आणण्याचे श्रेय हे नक्कीच या मोपेड्‌स प्रकारातील दुचाकींना द्यावे लागेल. या दुचाकींची लोकप्रियता भारतात मोठ्या प्रमाणावर आहे, त्याची कारणे ग्रामीण व शहरी भागांनुसार वेगवेगळी आहेत. दुचाकींमध्ये प्रामुख्याने मोटारसायकल, स्कूटर व मोपेड्‌स अशा तीन वर्गवारींमध्ये विभाजन होते. भारतात आजच्या घडीला स्कूटर्सपेक्षा मोटारसायकलींचे प्रमाण वाढले आहे, वाढत आहे. हिरो मोटो कॉर्प, होंडा, बजाज, टीव्हीएस, यामाहा, सुझुकी या प्रमुख कंपन्यांच्या मोटारसायकली दिसून येतात. मोटारसायकलींसाठीची ही सध्याची बाजारपेठ तरुणांची झाली असल्याचे या मोटारसायकलींच्या खपाकडे पाहून म्हणावे लागेल. स्कूटर्समध्ये होंडा, सुझुकी व टीव्हीएस, महिन्द्र या कंपन्यांची उत्पादने आहेत. एके काळी स्कूटर उत्पादनांमध्ये असणाऱ्या बजाजने स्कूटर्स उत्पादने बंद केली असून व्हेस्पाचा अलीकडेच पुन्हा प्रवेश झाला आहे. पायाभूत सुविधांमध्ये होत असणारी वाढ, शहरांमध्ये येण्याचे वाढलेले प्रमाण व त्यामुळे शहरांमध्ये आवश्यक असणारी दळणवळणाची साधने कमी पडत असल्याने दुचाकींचे प्रमाण वाढले आहे. इंधन बचतीसाठी सक्षम दुचाकी असते. इंधनांवर होणारा खर्च, सार्वजनिक वाहतुकींमध्ये जवळच्या अंतरांसाठी वाया जाणारा वेळ लक्षात घेऊन दुचाकींचे प्रमाण वाढले. तरुणांच्या आकांक्षा, अपेक्षा, गरजा, दृष्टिकोन बदलले आहेत. यामुळेच दुचाकींमध्ये, विशेष करून मोटारसायकलींसाठी मागणी वाढलेली दिसते. व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यायेण्याची प्रमुख आवश्यकता असल्याने मोठ्या शहरांपासून लहान तालुक्याच्या शहरांपर्यंतच्या भागामध्ये मोटारसायकली किंवा स्कूटर्स यांची आता मोठी गरज निर्माण झालेली आहे. काही कंपन्यांच्या स्कूटर्ससाठी तीन महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक ठिकाणी कौटुंबिक वाहन म्हणून दुचाकींचा उपयोग होताना दिसतो. एका कुटुंबातील पती, पत्नी व दोन मुले निर्धास्तपणे मोटारसायकल वा स्कूटरवरून रस्त्यांवर फिरत असल्याचे चित्र आहे. ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने व कायद्याचे उल्लंघन करणारी असली तरी त्याचा विचार फार गांभीर्याने केला जात नाही, ही चिंतेची बाब नक्कीच आहे. मात्र एकूणच दुचाकीचा हा वाढता वापर लक्षात घेता दुचाकीचे महत्त्व लक्षात येऊ शकते.

आरेखन, सुरक्षितता आणि नवीनता

गेल्या काही वर्षांमध्ये मोटारसायकलींमध्ये व स्कूटर्समध्ये तांत्रिक दृष्टीने विविध बदल झालेले दिसतात. टू स्ट्रोकच्या ऐवजी फोर स्ट्रोक इंजिन आले असून त्यामुळे पर्यावरणलक्ष्यी वाहन तयार झाले. तसेच मुख्य म्हणजे इंधनाची बचत होऊ शकली. याशिवाय पिकअपमध्ये झालेली वाढ, बॅलन्सचा वापर, मध्यभागी इंजिन, बॉडीमध्ये विशेष करून स्कूटर्सच्या बॉडीमध्ये पाइपचा वापर करण्यात आला, पत्रे एकमेकाला जोडून तयार करण्यात येणारी बॉडी व त्यामुळे वाढणारे वजन दूर करण्यात आले. पत्र्याऐवजी प्लॅस्टिक, फायबरचा वापर सुरू झाला, रंगामध्ये साध्या रंगाबरोबर मेटॅलिक रंगाचा वापर सुरू झाला, मोटारसायकलींच्या बॉडीमध्येही डायमंड चासीचा वापर होऊ लागला. त्यासाठी वापरण्यात येणारे लोखंड हे प्रक्रिया करून वापरले जाऊ लागले, हेडलॅम्प प्रखर झाले, आरेखनात तोचतोचपणा येऊ नये यासाठी प्रत्येक व्हर्जनमध्ये बदल केले जात असल्याचे चित्र दिसू लागले. ब्रेक्स लायनर्सपुरते न राहता डिस्क ब्रेक्स आले, इतकेच नव्हे तर व्हील अलॉय प्रकारची दिसू लागली, असे अनेक बदल या नवीन पिढीच्या मोटारसायकलींमध्ये व स्कूटर्समध्ये करण्यात आले. मोटारसायकलींच्या फ्रेम्स हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, त्यात आता नवीन पद्धतीचे बदल झाले आहेत. काही बदल पूर्णपणे नवीन तर काही बदल हे पूर्वीच्या फ्रेम्सचे, एक प्रकारे नूतनीकरण वा सुधारित आवृत्तीमधील म्हणावे लागतील. पूर्वी बॅकबोन या प्रकारातील फ्रेम मोटारसायकलीच्या बांधणीमध्ये वापरण्यात येत होती. सर्वसाधारणपणे मोटारसायकलीची बॉडीची रचना मानवी शरीरावर आधारभूत असते. मानवी शरीराचा विचारही या रचनेमध्ये केला जातो, ज्यामुळे मोटारसायकलस्वाराला त्रास कमी व्हावा, ही धारणा त्यामागे असते. विविध प्रकारच्या या रचनेद्वारे मोटारसायकलस्वाराला मिळणारा आरामदायी अनुभव, सुरक्षितता, स्थिरता या बाबी लक्षात घेतल्या जातात.


बॅकबोन फ्रेम – ही फ्रेम हिरो होंडाच्या सीडी १०० या प्रकारच्या मालिकेतील मोटारसायकलींना देण्यात आली होती. त्यात केलेले आरेखन हे तसे साधे, सोपे होते. स्पोर्टी मोटारसायकलींसारखे या रचनेचे स्वरूप नसल्याने मोटारसायकल असूनही ती स्पोर्टी म्हणून म्हणता येणार नाही. या रचनेमध्ये इंजिन फ्रेमवर बोल्टच्या साहाय्याने आधारभूत होते. स्टिअरिंगला हे संलग्न असणारे स्वरूप होते. डायमंड फ्रेम-सायकलीच्या रचनेवर आधारित असणारी ही फ्रेम आज भारतातील सर्वसाधारण मोटारसायकलींसाठी सर्रास वापरण्यात येत आहे. हिऱ्याच्या संरचनेत दिसणाऱ्या आकारावर आधारित असणारी ही फ्रेम कमी मूल्यातील असून त्यातील एक बाजू (वरची) ही स्टिअरिंग रॉडला जोडणारी आहे, तर दुसरी बाजू इंजिन पेलणारी आहे. पल्सर, सीबीझेड, अचिव्हर, करिझ्मा, एनफिल्ड, यामाहा या मोटारसायकलींसाठी आज या फ्रेमचा वापर केला जातो. त्यात डायमंड फ्रेम हे स्ट्रस रचनेसहदेखील तयार केलेले आहे. क्रेडल फ्रेम – बॅकबोन प्रकारातील व डायमंड फ्रेम प्रकारातील रचनेवर आधारित फ्रेम आरेखनाचा हा प्रकार. या रचनेत स्टिअरिंगला संलग्न असणाऱ्या बाजूतून तळातील बाजूने एक पाइपलाइन खाली आणून ती मागील त्रिकोणी आकाराच्या रचनेला संलग्न केलेली असते. त्यावर इंजिन ठेवण्यात येते. या इंजिनाचे अतिवजन या फ्रेमवर येत नाही, अशी रचना असते. सीडी डॉन, प्लॅटिना, स्प्लेंडर या प्रकारच्या मोटारसायकलींसाठी ही रचना देण्यात आलेली आहे.

ट्रेलिस फ्रेम – पाइप एकमेकांना विशिष्ट प्रकारे वेल्ड करून तयार करण्यात आलेल्या रचनेवर मोटारसायकलीचे इंजिन व


त्याचे आरेखन अवलंबून असते. केटीएम २०० ड्युक या प्रकारच्या मोटारसायकलीला ही फ्रेम देण्यात आली आहे. वजनाने हलकी असणारी व मजबूत असणारी ही फ्रेम स्पोर्टी मोटारसायकलीसाठी विशेष करून वापरण्यात येते.

पेरीमीटर फ्रेम किंवा दुहेरी (ट्‌विन) स्पार/बीम फ्रेम- बजाज पल्सर २०० एनएस व यामाहा आर १५ या दोन भारतीय मोटारसायकलींमध्ये ही फ्रेम वापरण्यात आली आहे. मोटारसायकलीचे इंजिन या फ्रेमवर आधारलेले नसते. शर्यतीच्या मोटारसायकलींमध्ये असणारी


ही फ्रेम तयार करण्याच्या दृष्टीने महाग मानली जाते. नियंत्रणासाठी, चांगल्या ब्रेकिंग प्रक्रियेसाठी हाताळण्यास महत्त्वपूर्ण मानली जाणारी ही रचना आहे. मोनोकॉक फ्रेम – मोटारींप्रमाणे बॉडी पॅनेलसंलग्न असणारी ही फ्रेम मोटारसायकलींनाही काही कंपन्यांनी दिलेली आहे. ही वेगळ्या प्रकारची रचना असून भारतीय मोटारसायकलींमध्ये तरी तूर्तास ती नजरेस पडत नाही.

मोटारसायकलींच्या रचनेमध्ये असणारे फ्रेमचे प्रकार व त्यात केलेले कंपनीनिहाय बदल हे दर सुधारणेमध्ये काही ना काही नवीन बाब सामावून घेणारे असून आजच्या घडीला मोटारसायकलींची रचना ही पूर्वीच्या मोटारसायकलींपेक्षा अधिक आकर्षक करण्यासाठी उपयुक्त ठरली आहे. आसनांची व्यवस्थाही आता बदललेली दिसते. स्कूटर्समध्येही अशा प्रकारचे बदल झाले आहेत. पूर्वी बजाज, व्हेस्पा या स्कूटर्समध्ये पत्रे एकमेकांना जोडून तयार स्कूटरची बॉडी म्हणजे तिचे शरीर तयार केले जात असे. आता डायमंड चासी वा ट्युब्युलर चासीवर आधारित म्हणजे मोटारसायकलीसारखे अंतर्गत रूप देत त्यावर पत्र्याचे वा प्लॅस्टिक-फायबरचे पंख जोडून वा लावून स्कूटरचे बाह्य रूप तयार केले जाते. पूर्वीच्या पत्रे एकमेकांना जोडून तयार करण्यात येणाऱ्या स्कूटर्स वजनाने अधिक होत्या पण त्या तितक्याच दणकटही होत्या. टिकावूपणा होता. आता तसे नाही. नवीन स्कूटर्स चालवायला सोप्या, वजनाने हलक्या, नियंत्रणाला सोप्या आहेत. पण त्यामुळे त्यांचे आयुष्य व सुटे भाग यांचे बदलही वारंवार करावे लागत आहेत, अर्थात हे सारे कालाय तस्मै नम: … असे म्हणून नवीन बदल स्वीकारावे, कारण हा सारा उद्योग व त्यांचा प्रसार हा नफ्यातोट्याचा उद्योग बनला आहे हे नाकारून चालणार नाही.

टू स्ट्रोकवरून फोर स्ट्रोट इंजिन हा सर्वात महत्त्वाचा व किफायतशीर बदल आहे. पेट्रोल भरताना त्यात टुटी ऑईल टाकावे लागत नाही, असे हे इंजिन मायलेजही चांगले देणारे असल्याने व वेग क्षणार्धात प्रदान करणारे आहे. किंबहुना नवीन गतिमान युगाचे हे संकेत आहेत.

मोटारसायकलीच्या आसनव्यवस्थेची रचना नवीन पिढीला आकर्षित करणारी आहे. पुढील बाजूने निमुळती आसणारी ही आसने मागे बसणाऱ्यासाठी काहीशा अधिक उंचीची व लहान आकाराची देण्यात आल्याचे अनेक मोटारसायकलींच्या मॉडेल्सवर नजर घातली असता दिसून येते. ही रचना व त्यामुळे सडपातळ बांधा प्राप्त झालेली एकंदर त्या मोटारसायकलीच्या रचनेचे आकर्षण न वाटले तरच नवल. वाऱ्याला काप जू शकले, अशी ही रचना वेगाला आमंत्रित करणारी आहे. स्कूटरच्या रचनेतही ज्या पद्धतीचे बदल करण्यात आले आहेत, ते पाहता दुचाकींच्या रचनेत उपयुक्ततेपेक्षा वेग, देखणेपण आणि कमी मूल्य राखण्याचे गणित उत्पादकांनी केले आहे. मात्र तरीही किमतीच्या एकूण तुलनेत दुचाकींच्या किमती ५० हजार रुपयांच्या वरच गेलेल्या आहेत. त्या कमी नाहीत, हे मान्य केले तरी त्यांच्या विक्रीमध्ये असणारी वाढ लक्षात घेता दुचाकीचे आकर्षण, गरज अजूनही भारतीय बाजारपेठेत स्पर्धात्मक स्वरूपात राहिली आहे. काळानुसार सर्वांना म्हणजे ग्रामीण, शहरी, निमशहरी भागात या दुचाकींची गरज वाढू लागली आहे. वाहन उद्योगांमधील दुचाकींची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, हेच या उद्योगाचे यश म्हणावे लागेल.

– रवींद्र यशवंत बिवलकर